नवी दिल्ली : भारताच्या उद्योग जगतात खळबळ उडवून देणारं वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टचे मर्जर आज जाहीर होत आहे. वॉलमार्ट ही जगप्रसिद्ध रिटेल चेन यानिमित्तानं भारताच्या ऑनलाईन बाजारपेठेत एन्ट्री करणार आहे. वॉलमार्टचे सीईओ कार्ल डगलस मॅकमिलन फ्लिपकार्टच्या बंगळुरमधल्या मुख्य कार्यालयात पत्रकार परिषदेत विलीनीकरणाची घोषणा करणार आहेत. फ्लिपकार्टची स्थापना सचिन आणि बिन्नी बन्सल या दोन तरुण भारतीयांनी २००७ मध्ये केली.  त्यानंतर भारतात आलेल्या मोबाईल आणि इंटरनेटच्या क्रांतीनं फ्लिपकार्टनं उत्तुंग भरारी घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साधारण चार वर्षांपूर्वी अॅमेझोन भारतात आली. अॅमेझॉन ही जगातली सर्वात मोठी ऑनलाईन रिटेल कंपनी आहे. त्यांनी भारतात वारेमाप पैसा ओतून ऑनलाईन खरेदी विक्रीचा भारतातला अनुभवच बदलून टाकला. अॅमेझॉनच्या या झंझावातापुढे फ्लिपकार्टचा रंग थोडा फिका पडयाला लागला.आणि व़ॉलमार्टनं नेमकी हीच संधी साधून भारतीय ऑनलाईन बाजारात अॅमेझॉनला टक्कर देण्याचा निर्णय घेतला. 


सचिन आणि बिन्नी बन्सल दोघांनीही त्यांच्याकडे समभाग वॉलमार्टला विकण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी बन्सल यांना किती पैसे मिळणार आहेत याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण हा व्यवहार भारतातल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यवहारांपैकी एक असणार हे मात्र नक्की आहे.