Warren Buffett Berkshire Hathaway Exits Paytm: जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या मालकीच्या बर्कशायर हॅथवे कंपनीने पेटीएम कंपनीची पालक कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्समधून आपली गुंतवणूक काढून घेतली आहे. बर्कशायर हॅथवेने आपली संपूर्ण हिस्सेदारी विकली आहे. बर्कशायर हॅथवेने वन 97 कम्युनिकेशन्समधील आपली 2.5 टक्के हिस्सेदारी 1,371 कोटींना विकली आहे. 


620 कोटींचा तोटा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बर्कशायर हॅथवेने 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 साली पेटीएममध्ये 2200 कोटींची गुंतवणूक केली होती. मात्र पेटीएमवर वॉरेन बफे यांनी ठेवलेला विश्वास त्यांना महागात पडला आहे. या गुंतवूकीमधून बर्कशायर हॅथवेला मोठं नुकसान झालं आहे. कंपनीने 301 कोटींचे शेअर्स आयपीओच्या माध्यमातून विकले. उरलेल्या शेअर्समध्ये कंपनीने जेवढी गुंतवणूक केलेली त्याचा विचार केल्यास 620 कोटींचा तोटा झाला आहे. 


कोणी विकत घेतले हे शेअर्स?


5 वर्ष गुंतवणूकदार म्हणून पेटीएमबरोबर राहिल्यानंतर बर्कशायर हॅथवेने प्रत्येक शेअरसाठी 877.29 रुपये दराने 1.56 कोटी शेअर्स विकले आहेत. या शेअर्सची संख्या ही कंपनीच्या एकूण शेअर्सच्या 2.5 टक्के इतकी आहे. हे सर्व शेअर्स 2 कंपन्यांनी विकत घेतले आहेत. घिसल्लो मास्टर फंड (Ghisallo Master Fund) आणि कॉप्टहॉल मॉरीशस इनवेस्टमेंट (Copthall Mauritius Investment) या कंपन्यांनी हे 1,371 कोटींचे शेअर्स विकत घेतलेत. घिसल्लो मास्टर फंडने 42,75,000 हजार शेअर्स विकत घेतलेत तर कॉप्टहॉल मॉरीशस इनवेस्टमेंटने 75,75,529 शेअर्स विकत घेतले आहेत. शेअरहोल्डिंग टेडानुसार सप्टेंबरच्या अखेरीस बर्कशायर इंटरनॅशनल्सकडे एकूण 1,56,23,529 शेअर्स होते. आता या दोन्ही कंपन्या पेटीएममध्ये 2.5 टक्क्यांचे वाटेकरी झाले आहेत.


शेअर घेताना किंमत किती होती?


'आयपीओ प्रॉस्पेक्टस'ने दिलेल्या वृत्तानुसार, बीएच इंटरनॅशनलने पेटीएमच्या पालक कंपनीमधील या शेअर्सचं अधिग्रहण केलं तेव्हा सरासरी खर्च 1,279.7 रुपये प्रति शेअर इतका होता. 2018 मध्ये सप्टेंबर महिन्यात बीएच इंटरनॅशनलने 2,179 कोटी रुपयांचे शेअर्स खर्च केलं. बीएच इंटरनॅशनलने सुरुवातीला आयपीओच्या माध्यमातून 2,150 रुपये प्रति शेअर दराने 301.70 कोटींचे शेअर्स विकले. आता कंपनीने 1,371 कोटींचे शेअर्स विकले आहे. पेटीएममधील आपल्या गुंतवणुकीमधून कंपनीला 1,672.7 कोटी रुपयांचा परतावा मिळाला. म्हणजेच कंपनीला 507 कोटींचा तोटा झाला. 


कंपनीवर परिणाम होणार?


वॉरेन बफे हे जगप्रसिद्ध गुंतवणूकदार असून जगभरामध्ये त्यांना शेअर मार्केटमधील सर्वाधिक यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ओळखलं जातं. अचानक वॉरेन बफे यांच्या मालकीच्या कंपनीने पेटीएममधून पैसे काढून घेतल्याने भविष्यात पेटीएम कंपनीवर कसा परिणाम होईल याबद्दल वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केला जात आहेत.