नवी दिल्ली : दोन दिवसांच्या एका नवजात चिमुकलीला रस्त्यात टाकून आई पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुझफ्फरनगरमध्ये ही घटना घडली असून सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकून जमा झालेल्या नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून चिमुकलीला रुग्णालयात दाखल केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार (६ जून) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुझफ्फरनगरमधील गुल्लरवाली गल्लीतील एका घराच्या पायऱ्यांवर चिमुकली नागरिकांना आढळली. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत तपासलं असता एक सँट्रो कार सकाळच्या सुमारास येते आणि त्यातुन चिमुकलीला बाहेर ठेवून आई पसार होत असल्याचं दिसत आहे.



डॉक्टरांच्या मते, ही चिमुकली आठ महिन्यांची असून प्री-मॅच्युअर आहे. या चिमुकलीचं वजन १८०० ग्रॅम असून प्रकृती खराब असल्याने उपचाराकरीता आयसीयूत दाखल केलं आहे.


या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला आहे.