VIDEO : BSF ने पाकिस्तीन बंकर्स उडवले, 3 दहशतवाद्यांचा खात्मा
पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर
मुंबई : नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सीमेवर पाकिस्तानी बंकर्स उडवलेत. या कारवाईचा व्हिडीओ बीएसएफने एएनआयच्या माध्यमातून शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली असून अलर्ट जारी करण्यात आला होता. त्याआधी सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं.
आरएसपुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तान सैन्याने गोळीबार केला. या गोळीबारात बीएसएफच्या एका जवान शहीद झाला. तर ५ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे भारतीय जवानांनी ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. रमजानच्या काळात दहशवाद्यांविरोधात कारवाई न करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर लगेचच पाकिस्तानने अशाप्रकारे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी सैन्याच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनी जशास तसं उत्तर दिलंय. बीएसएफच्या जवानांनी सीमेवरील पाकिस्तानी बंकर्स उडवले.
बीएसएफच्या या कारवाईमुळे पाकिस्तानी सैनिक चांगलेच हादरले आहेत. यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं मोठं नुकसान झाल आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी अखेर बीएसएफला ही कारवाई थांबवण्याची विनंती केल्याची माहिती मिळत आहे.