जम्मू: हिंदू धर्मीयांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या अमरनाथच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. मात्र, हिमालयीन पर्वतरांगांमधील गुहेमध्ये असणाऱ्या अमरनाथाचे दर्शन घेणे तितकेसे सोपे नाही. हा प्रवास अत्यंत खडतर मानला जातो. त्यामुळे मोजक्याच भाविकांना अमरनाथाचे दर्शन घेता येते. अमरनाथ यात्रा यशस्वी होण्यासाठी भारतीय जवानांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडिओच्यानिमित्ताने पुन्हा एकवार याचा प्रत्यय आला. इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलाकडून (ITBP)हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. अमरनाथ गुहेपासून काही अंतरावर असणाऱ्या बालताल परिसरातील हा व्हीडिओ आहे. या व्हीडिओत पर्वतावरून घरंगळत येणाऱ्या दगडांमुळे अमरनाथ यात्रेकरूंना इजा होऊ नये, यासाठी आयटीबीपीच्या जवानांनी स्वत:ची ढाल केल्याचे दिसत आहे. हिमालयातील अत्यंत तीव्र उतारावून वेगाने खाली येणाऱ्या या दगडांमुळे यात्रेकरूंना मोठा धोका असतो. मात्र, आयटीबीपीचे जवान जीवावर उदार होऊन त्यांच्याकडील ढालीच्या सहाय्याने हे दगड अडवताना दिसत आहेत. 


१ जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाला. येत्या १५ ऑगस्टपर्यंत ही यात्रा सुरु असेल. समुद्रसपाटीपासून ३,८८८ मीटर उंचीवर असलेली अमरनाथची गुहा हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधून ३६ किलोमीटर आणि बलटाल भागातील १४ किलोमीटरच्या मार्गावरून ही यात्रा जाते. या खडतर प्रवासात आयटीबीपीचे जवान यात्रेकरूंना ऑक्सिजन पुरवण्यापासून अनेक ठिकाणी मदत करतात.