मुंबई : वन्यजीव सप्ताह समाप्त होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिलेले असतानाच सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हि़डिओ व्हायरल होत आहे. जवळपास सोशल मीडियावरील शक्य त्या सर्वच माध्यमांनी या व्हिडिओनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडिओमध्ये जंगलचा राजाचा अर्थात सिंहाचा अनोखा थाट पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओचं आणखी एक आकर्षण म्हणजे मानवाशी या वन्य प्राण्यांचं असणारं नातं. गिरच्या वनातील वाटेवर बसलेल्या एका सिंहाला पाहून वन खात्यात काम करणारे कर्मचारी त्या सिंहाशी चक्क संवाद साधताना दिसत आहेत. बरं, तेसुद्धा गुजराती भाषेमध्ये बरं.  


सिंहाला आपण दिवसभर काम करत होतो, आता तरी घरी जाऊ दे अशी विनंती करणाऱ्या या व्यक्तीचं बोलणं ऐकत जणू त्याच्या विनंतीला मान देतच हा सिंह वाटेतून उठत आहे. मनुष्य आणि वन्य प्राण्यांमध्ये असणारं हे नातं आणि, वाट न अडवता शांतपणे निघून जाणारा हा जंगलचा राजा सध्या अनेकांच्याच मनाचा ठाव घेत आहे, हेसुद्धा खरं. सहसा वाघ, सिंह किंवा जंगलात मुक्तपणे वावरणारे हे प्राणी अनपेक्षितपणे समोर आल्यावर अनेकांना नेमकं काय करावं हेच लक्षात येत नाही. पण, हा व्हिडिओ मात्र याला अपवाद ठरत आहे असं म्हणायला हरकत नाही.



 


केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही ट्विटरच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन्यजीव सप्ताह 2020च्या निमित्तानं देशाला संबोधित करत काही संदेश दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा व्हिडिओ समोर आला.