विमानतळावर धडक कारवाई; भुईमूगाच्या शेंगांत सापडल्या परदेशी चलनाच्या नोटा
तब्बल ४५ लाखांची ही रक्कम...
नवी दिल्ली : सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच सीआयएसएफकडून एका धडक कारवाईमध्ये तब्बल ४५ लाख रुपयांची परदेशी चलनातील रोकड जप्त करण्यात आली आहे. शिजवलेलं मांस, भुईमुगाच्या शेंगा आणि बिस्कीटांमधून एक व्यक्ती ही रक्कम घेऊन जात असल्याचं लक्षात येताच दिल्ली विमातळावर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या रोकडस्वरुपातील पैशांमध्ये पाचशे आठ कोऱ्या करकरीत नोटा हाती लागल्या आहेत.
दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावरील टर्मिनल ३ येथे २५ वर्षीय मुराद अली याच्यावर ही कारवाई करण्यात आली. दुबईच्या दिशेने जाणाऱ्या विमानात चढण्यापूर्वीच संशयास्पद हालचालींमुळे त्याच्यावर नजर ठेवत सुरक्षा रक्षकांकडून अखेर ही कारवाई करण्यात आली.
ताब्यात घेण्यात आलेल्या प्रवाशाच्या सामानातून शिजवलेल्या मांसाच्या तुकड्यांमध्ये भुईमुगाच्या शेंगांमध्ये आणि बिस्कीटांमध्ये परदेशी चलनाच्या नोटा सापडल्याची माहिती सीआयएसएफचे प्रवक्ते जनरल हेमेंद्र सिंह यांनी दिलं. CISFच्या ट्विटर अकांऊंटवरुन याविषयीचा व्हिडिओसुद्धा पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये बिस्कीटांपासून, भुईमुगाच्या शेंगापर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये सौदी रियाल, कतारी रियाल, कुवैती दिनार, ओमानी रियाल आणि युरो अशा स्वरुपातील नोटा गुंडाळून अगदी शिताफीने लपवल्याच आल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी
दुबईचा प्रवासी व्हिसा असणाऱ्या या प्रवाशाकडून जप्त करण्यात आलेली ही एकूण रक्कम तब्बल ४५ लाखांच्या घरात आहे. त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्यानंतर सर्व रक्कम ही कस्टम विभागाकडे पाठवण्यात आली आहे. दरम्यान, ज्या व्यक्तीकडून ही रक्कम जप्त करण्यात आली त्याने आतापर्यंत दुबई आणि विविध देशांना सातत्याने भेट दिल्याचं उघधड झालं आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.