`जनता कर्फ्यू`मध्ये टाळ्या, थाळ्या आणि घंटानादात जनतेने मानले आभार
आम्ही कृतज्ञ आहोत!
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण भारतातील जनतेला रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं. जनतेनेही अतिशय उत्स्फूर्तपणे या आवाहनाला पाठिंबा दिला. Corona कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येक देशवासियाने आवश्यक असणारे सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजावेत असंही आवाहन त्यांनी केलं. याचवेळी मोदींनी राष्ट्रातील सर्व जनतेकडे एक विनंतीही केली. ही विनंती होती, कृतज्ञता व्यक्त करण्याची.
अतिशय नि:स्वार्थ अशा वृत्तीने कोरोना व्हायरसचं संकट ओढावलेलं असतानाही रुग्णांच्या सेवेत तत्पर असणाऱ्य़ा, प्रशासनाच्या सेवेत तत्पर असणाऱ्या आणि या संकटसमयी इतरांना कोणत्याही प्रकारे मदतीचा हात पुढे करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानण्याची साद मोदींनी दिली. त्यांनी दिलेली हीच साद ऐकत रविवारी घड्याळाचे काटे पाचच्या आकड्यावर स्थिरावले आणि पाचचा ठोका पडताच नागरिकांनी एकाच उत्साहात खिडक्यांमध्ये, बाल्कनीमध्ये आणि इमारतीच्या गच्चीवर येत टाळ्या आणि थाळ्या वाजवण्यास सुरुवात केली.
देशभरातून विविध ठिकाणी अनेकांनी पुढाकार घेत मोठ्या जबाबदारीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून थाळ्या आणि टाळ्या वाजवल्या. गल्लीबोळांमध्ये असणाऱ्या काही मंदिरांमध्ये यावेळी घंटानादही करण्यात आला. तर, काहींनी शंखनाद करत या तणावाच्या वेळी मदतलीया आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार मानले.
अतिशय खऱ्या भावनेने प्रत्येकजण यावेळी कृतज्ञता व्यक्त करताना दिसला. सानथोरांपासून सर्वांनीच या समाजाप्रती आपलीही जबाबदारी आहे, याचं भान राखत उत्स्फूर्तपणे या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या अनोख्या संकल्पनेस पाठिंबा दिला. यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्र आलं असता गर्दी टाळण्याकडेही अनेकांचाच कल दिसला.