नवी दिल्ली: सध्या भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाचे केंद्र झालेल्या गलवान खोऱ्यातून भारताच्यादृष्टीने चिंतेची आणखी एक बातमी समोर आली आहे. येथील गलवान नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे या भागात पहारा देणाऱ्या भारतीय जवानांना आता पाण्यापासून बचाव करणारे Waterproof पोशाख देण्याची गरज आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे चीनने यापूर्वीच ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्या सर्व सैनिकांना Waterproof पोशाख दिले होते. त्यामुळे गलवान नदीच्या थंड पाण्यातही हे जवान तासनतास उभे राहून पहारा देऊ शकतात. मात्र, भारतीय जवानांकडे अजूनही अशाप्रकारचे Waterproof कपडे नाहीत. त्यामुळे बर्फ वितळून गलवान नदीतील पाणी आणखी वाढल्यास भारतीय जवानांसमोर समस्या उद्भवू शकतात. 

सूत्रांच्या माहितीनुसार, १५ जूनच्या रात्रीही भारतीय जवानांसोबत संघर्ष झाला तेव्हादेखील चिनी सैनिकांनी Waterproof गणवेश घातले होते. त्यामुळे जखमी झाल्यानंतर कडाक्याच्या थंडीमुळे हायपोथर्मिया Hypothermia होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण चीनच्या बाजूला कमी होते. याउलट प्रत्यक्ष हाणामारीवेळी भारताचे केवळ तीन जवान शहीद झाले होते. मात्र, उर्वरित १७ जवानांपैकी अनेकांचा कडाक्याच्या थंडीमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ही गोष्ट लक्षात घेऊन आता भारतीय लष्करानेही दीर्घकालीन लढाईच्यादृष्टीने तयारी करायला सुरुवात केली आहे. 


#IndiaChinaFaceoff हाडे गोठवणाऱ्या थंडीमुळे जखमी झालेल्या अनेक जवानांचा मृत्यू



गलवान खोऱ्यात नदीलगत चीनने अनेक तंबू उभारले आहेत. भारताच्या १४ क्रमांकाच्या टेहळणी चौकीजवळ पहारा देणाऱ्या चिनी सैनिकांकडे Waterproof गणवेश आहेत. त्यांच्या पोशाखाचा खालचा भाग वॉटरप्रुफ आहे. त्यामुळे चिनी जवान वेळ पडल्यास पाण्यात लगेच उतरु शकतात. 

भारतीय सैन्यातील जवानही KM-120 ते PP-14 या भागात गस्त घालताना नदीत उतरतात. मात्र, Waterproof गणवेश नसल्याने त्यांचे बुट प्रत्येकवेळी भिजतात. त्यामुळे आता भारतीय जवानांनाही Waterproof गणवेश देण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.