आम्ही पंतप्रधान मोदींचा बुरखा फाडलाय; राहुल गांधींची घणाघाती टीका
नरेंद्र मोदी नक्कीच पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारविरोधात लढत आहेत, या कल्पनेवरून आता लोकांचा विश्वास उडाला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांविषयी मोदी आता व्यासपीठावर उभे राहून बोलू शकणार नाहीत. कारण, आम्ही पंतप्रधानांचा बुरखा फाडला आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. ते गुरुवारी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी राफेल करारासंदर्भात नरेंद्र मोदी यांच्यावर केलेले आरोप आणि उत्तर प्रदेशातील काँग्रेसची रणनीती या मुद्द्यांवर सविस्तरपणे भाष्य केले.
पंतप्रधान मोदी आणि भाजपा यंदाची लोकसभा निवडणूक जिंकू शकणार नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यानंतर केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. त्यावरून नरेंद्र मोदी नक्कीच पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
तसेच राफेल गैरव्यवहारासंदर्भात बोलताना राहुल यांनी म्हटले की, मी अजूनही 'चौकीदार चोर है' या घोषणेवर ठाम आहे. मी न्यायालयाचा हवाला देऊन तसे म्हटले, ही माझी चूक होती. मात्र, त्यासाठी नरेंद्र मोदींची माफी मागण्याची गरज नाही. मी अनावधानाने चूक केली आणि मी न्यायालयासमोर ते स्पष्टही केले आहे. त्यामुळे हे प्रकरण इथेच संपले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात मोठे सामर्थ्य ही त्यांची प्रतिमा आहे. या प्रतिमेचेच तुकडे केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
देशात मोठ्याप्रमाणावर बेरोजगारी आहे. शेतकऱ्यापुढे आत्महत्येशिवाय गत्यंतर उरलेले नाही. निवडणुकीतील प्राथमिक मुद्दा हा रोजगार आणि अर्थव्यवस्थेची स्थिती हाच आहे. मात्र, पंतप्रधान मोदी त्याविषयी बोलणार नाहीत. अशा स्थितीत सरकारविरोधात जो रोष आहे तो तुम्हाला निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळेल, असे राहुल यांनी सांगितले.