गुरदासपूर: भारताची लष्करी ताकद मोठी असून आमचे सैन्य कोणत्याही आव्हानासाठी तयार आहे, असा इशारा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पाकिस्तानला दिला. ते सोमवारी कर्तारपूर साहिब कॉरिडोअरच्या भूमीपूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सीमारेषेवर पाकिस्तकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरून पाकचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यावर निशाणा साधला. मी देखील सैन्यात होतो आणि मला जनरल बाजवा यांच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. लष्कराने तुम्हाला भारतीय जवानांवर हल्ले करायला शिकवले का? तुम्ही स्नायपरने आमच्या जवानांना मारता. अनेकदा लोक गावांमध्ये प्रार्थना करत असताना त्यांच्यावर बॉम्बचा मारा केला जातो. तुमच्या लष्कराने तुम्हाला हीच शिकवण दिली का? याला भ्याडपणा म्हणतात, अशा तिखट शब्दांत अमरिंदर सिंग यांनी जनरल बाजवा यांना लक्ष्य केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही शांततेवर विश्वास ठेवतो. मात्र, जनरल बाजवा यांनी एक ध्यानात घ्यावे की, भारताची लष्करी ताकद ही मोठी असून आमचे सैन्य कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायला तयार आहे. तसे घडायला नको कारण आम्हाला युद्ध नको आहे. आम्हाला शांततापूर्ण मार्गाने प्रगती करायची असल्याचे अमरिंदर सिंग यांनी सांगितले. 



उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज कर्तारपूर साहिब कॉरिडोअरची मुहूर्तमेढ रोवली. या कॉरिडोअरमुळे भारतातील शीख बांधवांचा पाकिस्नातील गुरुद्वारा दरबार साहिब येथे जाण्याचा मार्ग सुकर होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने २२ नोव्हेंबरला या मार्गाची बांधणी करण्याचा निर्णय घेतला होता. 


पाकिस्तानच्या नरोवाल जिल्ह्यात कर्तारपूर हे ठिकाण आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव हे १८ वर्षे याठिकाणी वास्तव्याला होते. त्यामुळे शीख धर्मीयांमध्ये कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला विशेष महत्त्व आहे.