नवी दिल्ली : आधार कार्डासाठीच्या बायोमेट्रिक्सबद्दल केंद्रीय मंत्र्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वीजा मिळवण्यासाठी लोकं कपडे काढतात पण आधार कार्डचं बायोमेट्रिक्स देण्याबाबत आक्षेप घेतात, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री के.जे. अलफोंस यांनी केलं आहे. तसंच आधार कार्डची कोणतीही माहिती लिक झाली नसल्याचा दावा अलफोंस यांनी केला आहे.


'इंग्रजांसमोर काढतात कपडे'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेचा वीजा मिळवण्यासाठी आम्ही १० पानांचा फॉर्म भरतो. स्वत:चे फिंगर प्रिंट्स देतो. इंग्रजांसमोर कपडे काढायलाही आम्हाला काही वाटत नाही. पण स्वत:च्या सरकारनं नाव आणि पत्ता विचारला तर वैयक्तिक आयुष्यावर हल्ला वाटतो, अशी टीका अलफोंस यांनी केली आहे.


सरकारनं दिलं आश्वासन


के.जे. अलफोंस हे मोदींच्या सरकारमध्ये पर्यटन आणि सूचना व प्रौद्योगिकी मंत्री आहेत. कोचीमध्ये झालेल्या फ्यूचर ग्लोबल डिजीटल समिटमध्ये अलफोंस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आधार कार्डावर फक्त तुमचं नाव आणि पत्ता असतो. तुमचा बायोमेट्रिक डेटा यूआयडीएआयकडे सुरक्षित आहे. हा डेटा सार्वजनिक केला जाणार नाही, असं आश्वासन अलफोंस यांनी दिलं आहे. नागरिकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. तसंच वेळोवेळी हे तंत्रज्ञान अपग्रेड करण्यात येईल, असं अलफोंस म्हणाले.


राहुल गांधींचा मोदींवर थेट हल्ला


नमो अॅपच्या माध्यमातून तुमचा डेटा खासगी कंपनीला दिला जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे. नमस्कार माझं नाव नरेंद्र मोदी आहे. मी भारताचा पंतप्रधान आहे. जेव्हा तुम्ही माझं अधिकृत अॅप साईन अप करता तेव्हा तुमचा सगळा डेटा अमेरिकी कंपन्यांना माझ्या मित्रांना देतो, असं ट्विट राहुल गांधींनी केलं होतं.


पंतप्रधान कार्यालयाचं प्रत्युत्तर


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे हे आरोप पंतप्रधान कार्यालयानं फेटाळून लावले आहेत. राहुल गांधींना टेक्नोलॉजीची माहिती नसल्याची टीका पंतप्रधान कार्यालयानं केली आहे. केंब्रिज एनालिटीकाच्या डेटा चोरीमध्ये काँग्रेसचं नाव आल्यामुळे लक्ष भरकटवण्यासाठी राहुल गांधी आरोप करतायत, असं प्रत्युत्तर पंतप्रधान कार्यालयानं दिलं आहे.