आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत- केंद्रीय आरोग्यमंत्री
तर कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण.....
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाावामुळे जगातील विकसित देशांमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती पाहायला मिळत आहे. भारतात तशी वेळ येणार नाही, असे तुर्तास वाटते. तरीही आपण संपूर्ण देशात कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
शनिवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले की, आपल्या देशात कोरोनाचा मृत्यूदर ३.३ टक्के इतका आहे. तर कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २९.९ टक्के इतके आहे. हे चांगल्या परिस्थितीचे द्योतक आहे. याशिवाय, सध्याच्या घडीला कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची कालावधी (डबलिंग रेट) ९.९ दिवस इतका आहे. गेल्या तीन दिवसांचा विचार करता हा कालावधी ११ दिवसांचा झाल्याची माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली.
गेल्या २४ तासांमध्ये देशात ३३२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ५९ हजार ६६२ इतकी झाली आहे. यापैकी ३९ हजार ८३४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर १७ हजारहून अधिक लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशातील ४२ जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्यामुळे ही सुद्धा प्रोत्साहनपर बाब ठरत आहे. नागरिकांनी स्वयंशिस्तीचं पालन केल्यास परिस्थिती बऱ्याच अंशी सुधारू शकते.