काश्मीर हवाय, पण काश्मिरी नकोत; ही परिस्थिती विषण्ण करणारी- पी. चिदंबरम
काश्मिरी जनतेवर आर्थिक निर्बंध लादण्याची भाषा
नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात काश्मिरी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी चिंता व्यक्त केली. आपल्याला काश्मीर हवाय, पण काश्मिरी नकोत. ही शोकांतिका पाहून मन विषण्ण होते, असे चिदंबरम यांनी म्हटले. त्यांनी गुरुवारी केलेल्या ट्विटसच्या माध्यमातून भाजप सरकारवर निशाणा साधला. पुलवामा हल्ल्यानंतर मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी काश्मीरवर आर्थिक निर्बंध लादण्याची भाषा केली होती. याविषयी बोलताना चिदंबरम यांनी उपरोधिकपणे म्हटले की, गुजरातच्या सरदार सरोवराच्याशेजारी उभारलेला स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुतळा काश्मिरींवर निर्बंध घालण्याची भाषा करणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहे.
१४ फेब्रुवारीला काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या भीषण स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ४० जवानांचा मृत्यू झाला होता. जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची मोठी लाट उसळली होती. यामध्ये काही समाजकंटकांनी देशाच्या विविध भागांमध्ये शिक्षणासाठी वास्तव्याला असलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली होती. याविरोधात सरकारने त्वरीत पावले उचलावीत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने यावर सुनावणी घेण्याची तयारी दर्शविली आहे.
मात्र, दुसरीकडे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात मोठा संताप आहे. मात्र, काश्मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यासंदर्भात होत असलेले सर्व दावे खोटे आहेत. अशी कोणतीही घटना घडू नये म्हणून आम्ही देशभरातील शैक्षणिक संस्थांच्या संपर्कात असल्याचे जावडेकर यांनी सांगितले होते.