नवी दिल्ली - ईव्हीएमवर होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत. पण देशातील निवडणुका या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मतदानयंत्रांच्या साह्यानेच होतील, असे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही स्थितीत पुन्हा मतपत्रिकांच्या साह्याने निवडणूक घेण्याकडे निवडणूक आयोग वळणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार केला जात असल्याची तक्रार कायम करण्यात येते. त्यातच काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये इंडियन जर्नालिस्ट असोशिएशनने आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत अमेरिकेतील हॅकर सय्यद शुजा याने २०१४ च्या निवडणुकीत मतदान यंत्रे हॅक करण्यात आली होती, असा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने गुरुवारी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकांमध्ये यापुढे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मतदानयंत्रांचाच वापर करण्यात येईल. निवडणूक प्रक्रियेतील पक्षकार आणि राजकीय पक्षांनी कितीही टीका केली आणि प्रतिक्रिया दिल्या तरी त्याला उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत. पण त्याचवेळी एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की निवडणूक आयोग आता एक पाऊल मागे सरकणार नाही. पुन्हा मतपत्रिकांच्या साह्याने देशात निवडणुका घेतल्या जाणार नाहीत, असे सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले.


कोणतीही निवडणूक आली आणि त्याचे निकाल जाहीर झाले की काही जणांकडून ईव्हीएमचा मुद्दा कायम उपस्थित केला जातो. ईव्हीएम हॅक करण्यात आले, त्यामध्ये फेरफार करण्यात आले, असे आरोप कायम केले जातात. त्यातच सय्यद शुजा याने केलेल्या आरोपांमुळे पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला. २०१४ मधील निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्यात आले होते. त्यासाठीचे तंत्रज्ञान आम्ही तयार केले होते, असा आरोप शुजा याने केला. यानंतर निवडणूक आयोगाने सय्यद शुजा विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले आहेत. 



ईव्हीएममध्ये फेरफार केला जात असल्याची टीका होऊ लागल्यानंतर निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट मतदान यंत्रे वापरण्यास सुरुवात केली. यामध्ये प्रत्येकवेळी मतदाराने मत दिल्यानंतर एक स्लीप छापली जाते. ज्यावर त्या मतासंदर्भातील माहिती दिलेली असते. त्यामुळे मतदान यंत्रात गडबड केली जाऊ शकत नाही. गेल्या काही निवडणुकांपासून बहुतांश ठिकाणी व्हीव्हीपॅट मतदानयंत्रांचा वापर निवडणुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.