India Weather Update : अवेळी पडलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. (Weather Forecast Today) त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. देशात अनेक ठिकाणी आठवड्यापासून जोरदार ते तुरळक पाऊस पडत आहे. पाऊस आणि वाऱ्यामुळे काही ठिकाणी वातावरणात गारवा निर्माण झाला असून लोकांना फेब्रुवारीसारखी थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे वातावरण आल्हाददायक झालेय. दरम्यान, अचानक वाढलेल्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सातत्याने हवामानात बदल होत असल्याचे याचे दुष्परिणामही एकाचवेळी दिसून येत आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत शास्त्रज्ञांनी भविष्यात हवामान कसे असेल याची मोठी अपडेट दिली आहे. 


चक्रीवादळाची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारता शेजारील राष्ट्रातील हवामानाच्या बदलाचा परिणाम हा भारतातही जाणवणार आहे.  स्कायमेटच्या मते, एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स अफगाणिस्तान आणि आसपासच्या भागात सक्रिय झाला आहे. तो आता हळूहळू उत्तर भारताकडे सरकत आहे. त्याचवेळी नैऋत्य राजस्थानमध्ये चक्री वाऱ्यांचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे चक्रीवादळाची मोठी शक्यता आहे. तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, अंतर्गत ओडिशा, रायलसीमा आणि झारखंडवर कमी दाबाचे क्षेत्र दिसत आहे. त्यामुळे येथे पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


गारपीठ झाल्याने शेतीचे मोठे नुकसान


उत्तर भारतात अवकाळी पाऊस झाला. देशात गेल्या 24 तासांत दिल्ली-एनसीआर, हरियाणाचे काही भाग, पश्चिम उत्तर प्रदेश, ईशान्य भारत, उत्तर तमिळनाडू, दक्षिण छत्तीसगड, किनारी ओडिशा, गुजरात आणि उत्तर पश्चिम राजस्थान येथे हलका ते मध्यम पाऊस झाला. तर अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीठ झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. 


आज हवामान कसे असेल ?


भारतीय हवामानाच्या अंदाजानुसार येत्या 24  तासांत उत्तर भारतातील पंजाब,  हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर तसेच तमिळनाडू आणि दक्षिण केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आग्नेय मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमध्ये हलका पाऊस पडू शकतो. तर गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबाद, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात तुरळक हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत अंशतः ढगाळ वातावरण असेल. मात्र, पाऊस पडणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.