Weather Report: सावधान ! उष्णतेचा कहर वाढणार, तर या भागात पावसाचा इशारा
अनेक राज्यांमध्ये तापमान झपाट्याने वाढत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
मुंबई : मार्च महिन्यातच उष्णतेने कहर सुरु केला आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमान झपाट्याने वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे लोकं हैराण झाले आहेत. भारतीय हवामान खात्यानुसार (IMD), आठवड्याच्या शेवटी दिल्लीत किमान तापमान २० अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानच्या काही भागात, मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात आणि गुजरातच्या काही भागात उष्णतेची लाट परत येण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती २९ मार्चपर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे. (IMD predicts extreme heat wave in many states)
ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस (Rain) पडू शकतो. कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. उत्तर आणि मध्य भारतातील काही भागात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये उष्णतेची लाट
बिहारमध्ये पश्चिमेकडील वाऱ्याच्या प्रभावामुळे तापमानात बदल होत आहे. पाच दिवसांत उष्णतेची लाट अपेक्षित आहे. येत्या काळात तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्याचे तापमान लवकरच 41 अंशांच्या पुढे जाऊ शकते.
उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट दिसून येत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार या महिन्याच्या अखेरीस उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. एवढेच नाही तर तापमानातही वाढ होणार आहे. हवामान खात्यानुसार, 28 मार्चपर्यंत कमाल तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. दरम्यान, राज्यात पावसाची शक्यता नाही. सध्या राज्यात हवामान निरभ्र राहणार असून आगामी काळात कोणताही बदल अपेक्षित नाही.
काही भागात पावसाची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नीमच, मंदसौर, राजगढ, आगर, गुना, टिकमगड आणि निवारी या 7 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, माळवा आणि निमारमधील अनेक जिल्ह्यांत रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने (IMD) सांगितले की, गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ भागातील लोकांना 28 मार्चपर्यंत तीव्र उष्णतेचा सामना करावा लागेल. यासोबतच हवामान खात्याने ईशान्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतासाठी पुढील पाच दिवसांत पावसाचा इशाराही जारी केला आहे.
पुढील चार दिवस दक्षिण भारतातील काही भागात पावसाची शक्यता आहे. IMD नुसार, २४ तासांत कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, ओरिसा येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कर्नाटकमध्ये पुढील 5 दिवसांत पावसाची शक्यता आहे.