पूरग्रस्त दिल्लीसमोरील संकट वाढणार! Yellow Alert जारी; दिल्लीकरांचा विकेण्डही पावसातच
India Weather Update: मागील आठवड्याभरामध्ये उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानसहीत दिल्लीमध्येही जोरदार पाऊस बरसला. शनिवारीही दिल्लीत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Weather Update India: पुराचं संकट ओढावलेल्या दिल्लीसमोरील अडचणी आगामी दिवसांमध्ये अधिक वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी हवामान खात्याने दिल्लीला यलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी दिल्लीमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्यामध्ये दिल्लीतील तपमान सामान्यपेक्षा कमीच असेल असं सांगण्यात आलं आहे.
उत्तरेतील राज्यामध्ये मुसळधार
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिल्लीतील अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडला. त्यामुळेच तापमान एक डिग्रीने कमी झालं आहे. दिल्लीचं सोमवारचं कमाल तापमान 34.2 डिग्री सेल्सिअस होतं. तर किमान तापमान 26.8 डिग्री सेल्सिअस होतं. हवामान खात्याने नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसाने संपूर्ण भारत मागील काही दिवसांमध्ये व्यापला आहे. त्यामुळेच उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानसहीत दिल्लीमध्येही मागील आठवड्याभरात जोरदार सरी बरसल्या. इतर राज्यांच्या तुलनेत दिल्लीमध्ये कमी क्षमतेनं पाऊस झाला तरी युमनेला पूर आल्याने दिल्ली जलमय झाल्याचं पहायला मिळालं.
आजही दिल्लीत पाऊस
शनिवारी दिल्लीवर ढगांची चादर असेल असं सांगण्यात आलं आहे. तसेच दिल्लीचं तापमान 33 ते 27 डिग्री सेल्सिअस दरम्यान असेल असंही सांगण्यात आलं आहे. 18, 19, 20 जुलै रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी सर्वाधिक तपमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 26 ते 27 डिग्रीपर्यंत असण्याची शक्यता आहे.
अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस
भारतामधील एक तृतीयांश भागामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस आतापर्यंत झाला आहे असंही हवामानतज्ज्ञांनी सांगितलं आहे. देशातील 271 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर 134 जिल्ह्यांमध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. देशातील 42 टक्के भूभागावर सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून यामध्ये पूर्व भागताबरोबर दक्षिणेकडील भागांचाही समावेश आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण न झाल्याने जून महिन्यामध्ये सरसरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचं सांगण्यात आलं आहे. "बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा हा सामान्यपेक्षा 13 टक्के कमी आहे. सामान्यपणे जून ते सप्टेंबरमध्ये या भागातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात चांगला पाऊस होतो," असं भारतीय हवामान खात्याचे निर्देशक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी सांगितलं आहे.
13 जिल्ह्यांत स्थिती चिंताजनक
पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. 1 जून ते 14 जुलैदरम्यानच्या आकडेवारूनुसार सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या 271 जिल्ह्यांपैकी 13 जिल्ह्यांमधील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे.