नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यामध्ये फिरायला जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. या मोसमात उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. यंदाही अनेकांचीच पावलं या राज्यांच्या दिशेनं वळत आहेत. असं असतानाच या भागांमध्ये कडाक्याची थंडी पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर भारतातील पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टी आणि मैदानी भागांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी असंच एकंदर वातावरण या राज्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. 


तांत्रिक शब्दांत सांगावं तर , वेस्टर्न डिस्टर्बन्समुळं हे बदल होणार आहेत. 4 डिसेंबरपर्यंत वेस्टर्न डिस्टर्बन्स पश्चिम हिमालयापर्यंत पोहोचेल. परिणामी हवामानात मोठे बदल होणार आहेत. 


स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार 4 डिसेंबरपासून जम्मी काश्मीर आणि लडाख पट्ट्यामध्ये बर्फवृष्टीला सुरुवात होणार आहे. 


5 डिसेंबरपासून हवामानातील हे बदल हिमाचल प्रदेशपर्यंत पोहोचणार आहेत. ज्यामागोमाग उत्तराखंडमध्येही तापमानाचा पारा खाली जाणार आहे. 


एकिकडे पर्वतीय भाग बर्फवृष्टीने झाकले जाणार आहेत, तर दुसरीकडे मैदानी भागांमध्ये अतिशय जोराच्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत होणार आहे. 


फक्त उत्तरेकडील राज्य नव्हे, तर महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटणार आहेत. हवामानात होणारे बदल पाहता याची सुरुवातही झाल्याचं म्हटलं जातंय. 


तज्ज्ञांच्या माहितीनुसार डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान वायव्य, दक्षिण आणि ईशान्य भारतात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असू शकतं. 


मराठवाडा, विदर्भात मात्र तापमान सरासरीपेक्षा कमी राहू शकतं.