All India Weather Forecast: यंदाच्या मान्सूनचा मुक्काम ठरलेल्या दिवसांत संपला आणि पाहता पाहता राज्यासह देशातूनही मान्सून माघारी फिरला. परतीच्या पावसाचा प्रवास आता अखेरच्या टप्प्यामध्ये पोहोचताना दिसत असतानाच महाराष्ट्रात उन्हाचा दाह आणखी वाढला. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांनंतर राज्यात October Heat चं प्रमाण आणखी वाढणार आहे. थोडक्यात तापमानवाढ होणार असल्यामुळं नागरिकांना मोठ्या हवामान बदलांना सामोरं जावं लागणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस हा दाह कमी होताना दिसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारपासून कोकण, मुंबई, नवी मुंबई, पालघर, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये उकाडा नागरिकांना हैराण करेल, तर सातारा, कोल्हापुरात पहाटेच्या वेळी तापमानाच काहीशी घट नोंदवली जाणार आहे. राज्याच्या घाटमाथ्यावरील भागामध्येही संध्याकाळच्या वेळी काही अंशांची घट नोंदवण्यात येईल. 


देशाच्या उत्तरेकडे थंडीची चाहूल 


इथं महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना आता हेवा वाटतोय तो म्हणजे देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांचा. पश्चिमी झंझावातामुळं एकिकडे दिल्लीमध्ये पावसाच्या हजेरीनं वातावरणात गारवा पसरलेला असतानाच दुसरीकडे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्येही तापमानात घट नोंदवली गेली आहे. 


बर्फवृष्टीमुळं चारधाम यात्रा प्रभावित 


जगातील सर्वाधिक उंचीवर असणारं शंकराचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुंगनाथ मंदिर परिसरात सोमवारपासून बर्फवृष्टीला सुरुवात झाली. शिवाय चारधाम यात्रा मार्ग, केदारनाथ धाम इथंही बर्फवृष्टी झाली. ज्यामुळं चारधाम यात्रा प्रभावित झाली असून, उत्तराखंडमध्येही थंडीची सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये या भागात हिमवृष्टी सुरुच राहणार आहे. परिणामी पर्वतीय क्षेत्रांच्या दिशेनं येणाऱ्या पर्यटकांनी थंडीची सोय करूनच इथं यावं असं अवाहन प्रशासन करताना दिसत आहे. 


हेसुद्धा वाचा : सावधान! अरबी समुद्रातून आस्मानी संकट; येत्या 9 दिवसात 2 चक्रीवादळं धडकणार?


 


जम्मू काश्मीर प्रांतातही हिवाळ्याची सुरुवात झाल्याचं चित्र आता अधिक स्पष्टपणे दिसू लाहलं आहे. गुलमर्गसोबतच इतर पर्वतांवर बर्फाची चादर तयार झाली आहे. बान्दीपोरा, श्रीनगर, गुरेजमध्येही प्रचंड हिमवृष्टी होत असून, लडाखच्या दिशेनं जाणाऱ्या वाटा आता बंद झाल्या आहेत. पुढच्या 24 तासांमध्ये येतील मैदानी भाग वगळता पर्वतीय क्षेत्रांमध्ये बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.