लग्नघटीका समीप, नवरदेवही होता तयार, पण `त्या` एका गोष्टीमुळं पोलिसांनी माघारी धाडली वरात
लग्न न होताच त्याला माघारी पाठवण्यामागे नेमकं काय कारण?
देहरादून : कोरोनाचा (Corona) कहर काही केल्या संपण्याचं नाव घेत नसतानाच आता यामध्येच आपल्या जीवशैलीमध्ये बदल करत जगण्याचा निर्णय जनसामान्यांनी घेतला आहे. सणवार, समारंभ आणि अगदी लग्नसोहळेही याच वातावरणात पार पडत आहेत. पण, यातही हा कोरोनारुपी मीठाचा खडा व्यत्यत आणताना दिसतोय.
युपीतील पिलीभीत येथून एक व्यक्ती आपल्याच लग्नाची वरात घेऊन उत्तराखंड (Uttarakhand) येथील खटीमा येथे जात होता. पण, त्याचवेळी असं काही झालं ज्याची तुम्ही- आम्हीही कल्पना केली नसेल. उत्तराखंडच्या सीमेवर पोहोचताच वरासह त्य़ाच्यासमवेत असणाऱ्यांची नियमानुसार कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये खुद्द नवरदेवच कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं स्पष्ट झालं.
कोरोना चाचणीचा हा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी लगेचच नवरदेव आणि त्याच्यासमवेत असणारी संपूर्ण वरातच माघारी पाठवली. तिथं नवरीच्या घरी एकच शांतता पसरली, तर आरोग्य विभागही सतर्क झाला.
Coronavirus : 3 पैकी एका रुग्णाचा मृत्यू, कोरोनाचा 'सुपर म्युटंट' माजवणार हाहाकार
कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर तातडीने बाधितांना विलगीकरणात ठेवण्यात आलं. शिवाय त्याच्या संपर्कात आलेल्यांचीही कोरोना चाचणी करुन घेण्यात आली. नवरदेवच कोरोनाबाधित असल्यामुळं आता त्याच्या वरातीत जमाविष्ट झालेल्या जवळपास 40 जणांवर कोरोनाचं संकट घोंगावत आहे. 14 दिवसांनंतर कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर या सर्व मंडळींना उत्तराखंडच्या हद्दीत प्रवेश दिला जाणार आहे.
लग्नघटीका समीप आलेली असतानाच कोरोनाचं संकट अशा प्रकारे आपल्यावर धडकेल आणि होत्याचं नव्हतं करेल अशी कोणीही अपेक्षा केलेली नसतानाच हे सारं घडलं. ज्यामुळे वधु पक्षालाही धक्काच बसला. या विवाहसोहळ्यासंबंधीची चर्चा सध्या सर्वत्र सुरु असून अनेकांनीच या मंडळींच्या उत्तम आरोग्यासाठी कामना केली आहे.