ममता बॅनर्जींचे धरणे आंदोलन मागे; आता दिल्लीत धडकणार
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन गुजरातमध्ये परतले पाहिजे.
कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाविरोधात पुकारलेले धरणे आंदोलन अखेर मंगळवारी संध्याकाळी मागे घेतले. सीबीआय पथकाकडून रविवारी पोलीस आयुक्तांविरोधात कोलकाता येथे करण्यात आलेल्या कारवाईनंतर ममता यांनी हे आंदोलन सुरु केले होते. ममतांच्या या आंदोलनामुळे गेल्या दोन दिवसांपासून देशातील राजकारण चांगलेच तापले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निकाल सकारात्मक आणि लोकशाहीचा विजय आहे. त्यामुळे मी हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. मात्र, १२ ते १४ फेब्रुवारीला त्या पुन्हा दिल्लीत आंदोलन करणार आहेत. यावेळी ममता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. केंद्र सरकार तपासयंत्रणांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या केंद्रात एकाधिकारशाहीचे सरकार आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन गुजरातमध्ये परतले पाहिजे, असे ममता यांनी म्हटले.
तत्पूर्वी आज संध्याकाळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंदोलनस्थळी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी या विरोधकांच्या आघाडीच्या शिल्पकार आणि मुख्य स्तंभ आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील सर्व ४२ जागांवर त्यांना विजय मिळेल. त्यामुळे निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्तरावर त्यांची भूमिका महत्त्वाची असेल, असे चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले. यानंतर चंद्राबाबू यांनी ममता बॅनर्जींना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीचा मान ठेवत ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन मागे घेतले.
शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी तपासासाठी सीबीआयचे पथक रविवारी कोलकातामध्ये दाखल झाले. त्यानंतर राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यासाठी गेलेल्या पथकाला पश्चिम बंगालमधील पोलिसांनीच ताब्यात घेतले. राजीव कुमार यांच्या निवासस्थानी प्रवेश करण्यास त्यांना नकार देण्यात आला. रात्री उशीरापर्यंत त्यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात ठेवले होते. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. या सर्व घडामोडींनंतर ममता बॅनर्जींनी धरणे आंदोलन सुरु केले होते.