Save the Constitution : वाद पेटला! केंद्र सरकारविरोधात ममता बॅनर्जींचं धरणं आंदोलन
विरोधकांसाठी ममतांचं समर्थन
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सुरु असणाऱ्या राजकीय नाट्याने सर्वांचच लक्ष वेधलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकारमध्ये असणारा वाद आता चव्हाट्यावर आला असून बॅनर्जी यांच्या धरणं आंदोलनामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळालं आहे. शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी चौकशीसाठी कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे प. बंगालमध्ये अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. ममता सरकारची ही भूमिका पाहता त्यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याचा मुद्दा उचलून धरत त्यांच्याविरोधात सीबीआय सोमवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं कळत आहे.
अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याच्या या प्रकारानंतर एक नवा वाद कोलकात्यात पेटला. ज्या धर्तीवर ममता बॅनर्जीं यांनी केंद्र सरकार आणि सीबीआयविरोधात आंदोलनास सुरुवात केली.
एकिकडे ताब्यात घेतलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांची कोलकाता पोलिसांनी मुक्तता केली. तर इथे रविवारी रात्रीपासूनच बॅनर्जी यांनी 'संविधान बचाव' या नावाने धरणं आंदोलनाची हाक दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुडाचं राजकारण करत असून, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सांगण्यावरुन सीबीआयकडून हे टोकाचं पाऊल उचलण्याच आलं असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यानंतर हा वाद अधिकच पेटताना दिसत आहे.
सध्याच्या घडीला सुरु असणाऱ्या या आंदोलनाने अनेकांचच लक्ष वेधलं असून या आंदोलनास मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला जात आहे. तृणमूक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींची प्रतिकृती असणाऱ्या पुतळ्याचं दहन करत त्यांचा विरोध केला. तर, हुगळी येथे रेल रोको करत कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.
रातोरात अशी झाली आंदोलनासाठीची तयारी
मुख्य म्हणजे आता येत्या काळात या आंदोलनाचे काय पडसाद असणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. मोदींच्या भूमिकेचा विरोध करत पुकारण्यात आलेल्या या आंदोलनासाठी कोलकात्यात रातोरात मंचाची उभारणी करण्यात आली. ममता बॅनर्जींसोबत पोलीस आयुक्त राजीव कुमार हे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पोलीस आयुक्त राजीव कुमार हे उत्तम पोलीस कर्मचारी असल्याचं ममता बॅनर्जी यांचं म्हणणं आहे. अशा पोलीसांचं समर्थन करणं गरजेचं असून सीबीआय मनमानी करत असल्याच्या आरोपावर त्या ठाम आहेत.