West Bengal : पश्चिम बंगालमध्ये एका शाळेत पहिलीचा विद्यार्थी अचानक गायब झाला होता. बराच वेळ त्याचा शोध सुरु होता. मात्र दोन दिवसांनी त्याचा मृतदेह शाळेच्या जवळ असलेल्या एका तलावाजवळ सापडला. पोलिसांनी मुलाचा मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. शवविच्छेदनानंतर मात्र सर्वानांच धक्का बसला आहे. शवविच्छेदनात मुलाच्या डोक्यावर वार केल्याचे समोर आलं. पोलिसांनी तपास केला असता याप्रकरणात हादरवणारी बातमी समोर आली आहे. त्याच शाळेतील एका आठवीत शिकणाऱ्या मुलाने ही हत्या केल्याचे उघड झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील एका खासगी शाळेत हा सगळा प्रकार घडला आहे. मंगळवारी 30 जानेवारी रोजी मधल्या सुट्टीदरम्यान, मृत मुलगा गायब झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी बेपत्ता असलेला मुला मुलगा मृतावस्थेत आढळला. सुरुवातीला मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचा संशय होता. मात्र शवविच्छेदन अहवाल आणि तपासात पोलिसांना आठवीतल्या मुलावर संशय आला. कारण मृत मुलाच्या मृत्यूनंतर तो दोन दिवसांपासून शाळेत जात नव्हता. पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा आठवीतल्या मुलाने हत्या केल्याचे कबुल केले.


आठवीच्या मुलाने सुट्टीसाठी पहिलीच्या विद्यार्थ्याची हत्या केल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. पुरुलियाचे पोलीस अधिक्षक अभिजीत बॅनर्जी यांनी यासंदर्भात माहिती दिली. आरोपी विद्यार्थी हा वसतिगृहात राहत होता. आठवडाभरापूर्वीच तो वसतिगृहात आला होते आणि त्याला घरी परत जायचे होते. एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर शाळा सुट्टी देते, असे त्याने कोणाकडून तरी ऐकले होते. त्यामुळेच त्याने सुट्टीसाठी कोणाची तरी हत्या करण्याचे ठरवले.


आरोपी विद्यार्थ्याने पहिलीतल्या विद्यार्थ्याला आमिष दाखवून तलावाच्या काठावर नेले. त्यानंतर मुलाने संधी साधून त्याच्या डोक्यावर वार करून त्याला तलावात फेकून दिले.


"आरोपी मुलगा नुकताच वसतिगृहात आला होता आणि आम्हाला त्याच्यामध्ये काही असामान्य दिसले नाही आणि त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही," अशी माहिती शाळेतील मुख्याध्यापक युधिष्ठिर महतो यांनी दिली. पहिलीतल्या मुलाच्या हत्येसाठी हा मुलगा जबाबदार असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला त्याचा बुडून मृत्यू झाला असे आम्हाला वाटले. पण नंतर असे दिसून आले की हा आठवीतील मुलगा मृतदेह सापडल्यानंतर बेपत्ता होता. चौकशीत तो हत्येत सहभागी असल्याचे समोर आले," असेही मुख्याध्यापक महतो म्हणाले. 


दरम्यान, पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले. आता तेथून त्याला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.