Video : रेशनकार्डवर `दत्ता` ऐवजी लिहिलं `कुत्ता`; तरुणाने भुंकून भुंकून सरकारी अधिकाऱ्यांना केले हैराण
नाव बदलण्यासाठी ही व्यक्ती सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत राहिली, पण नाव बदलले नाही आणि मग...
सरकारी कामकाज म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. सरकारी कार्यालयात (Governmet Office) वेळेत काम पूर्ण झाल्यावर अनेक जण सुटकेचा निश्वास टाकतात. अनेकांना सरकारी कामासाठी कार्यालयांमध्ये अनेकदा खेटे मारावे लागतात. लाल फितीच्या कारभारात कामे पूर्ण होण्यास अनेकदा बराच वेळ लागतो. काही वेळा काम वेळेत पूर्ण होतं पण काहीतरी चूक राहून जाते आणि त्याचा फटका सामान्यांना फटका बसतो. पण काही लोक असेही असतात जे नेहमीच वरचढ असं काहीतरी करत असतात. अशाच एका व्यक्तीच्या सरकारी कामात चूक झाली आणि ती सांगण्यासाठी जे कृत्य केले ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसलाय.
पश्चिम बंगालच्या (west bengal) बांकुरा जिल्ह्यातील एक माणूस कुत्र्यासारखा (Dog) दोन्ही हात आणि पाय जमिनीवर ठेवून चालत होता. तसेच गाडीच्या मागे धावत कुत्र्यासारखा भुंकत होता. त्याचे असं करण्यामागचे कारण म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांकडून कामात झालेली चूक. कुत्र्यासारखे वागणाऱ्या या व्यक्तीचे नाव श्रीकांती कुमार दत्ता आहे. श्रीकांती हे एका सरकारी कार्यालयात कुत्र्यासारखा भुंकत होते.
माध्यमांच्या वृत्तानुसार, बांकुरा जिल्ह्यातील बिकना येथे राहणारा श्रीकांती कुमार दत्ता हे काही दिवसांपासून कुत्र्यासारखे वागत आहे. श्रीकांती हे घरात तसेच घराबाहेरही कुत्र्यासारखे वागतायत. त्यांच्या अशा वागण्याचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये श्रीकांती हे बिकोनाच्या गटविकास अधिकाऱ्यावर (BDO) भुंकताना दिसत आहे. त्यांनी असे केल्याने गटविकास अधिकारीही चक्रावले. श्रीकांती हे अधिकाऱ्याच्या वाहनाच्या मागेही धावताना दिसले.
श्रीकांती यांचे कुत्र्यासारखे वागण्याचे कारण समोर आले आहे. श्रीकांतीचे रेशनकार्ड काही दिवसांपूर्वी अपडेट झाले होते. शिधापत्रिकेत 'श्रीकांती कुमार दत्ता' ऐवजी त्यांचे नाव 'श्रीकांती कुमार कुत्ता' असे लिहिले होते. यानंतर श्रीकांती यांनीं शिधापत्रिकेत नाव बदलण्यासाठी स्थानिक कार्यालयात अनेक फेऱ्या मारल्या. त्याची इतर कागदपत्रेही दाखवली, ज्यात त्यांचे बरोबर नाव लिहिले होते. मात्र कर्मचाऱ्यांनी त्याचे नाव दुरुस्त केले नाही.
नाव बदलण्याच्या तक्रारीकडे कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे श्रीकांती यांना ही अभिनव कल्पना सुचली. स्थानिक गटविकास अधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर ते लोकांसमोर 'कुत्र्या'सारखे वागू लागले. जेव्हा बीडीओ त्यांच्या अधिकृत वाहनात बसून कार्यालयात पोहोचले तेव्हा श्रीकांती त्यांना तक्रार अर्ज देत असतानाही कुत्र्यासारखे भुंकत राहिले. त्यांच्या वागण्याने बीडीओही घाबरले. नंतर त्यांचा अर्ज घेतल्यानंतर बीडीओला संपूर्ण बाब समजली आणि श्रीकांतीच्या नावातील 'कुत्रा' हा शब्द काढून टाकण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. तसेच रेशनकार्डवर त्याचे नाव पुन्हा बदलून देण्यास सांगितले.