नवी दिल्ली : भारताच्या इतिहासात सर्जिकल स्ट्राईकची आठवण कायम स्वरुपात कोरली गेली आहे. भारताकडे कोणी वाईट नजरेने पाहीले तर काय होऊ शकते ? याची प्रचिती सर्जिकल स्ट्राइकने साऱ्या जगाला करुन दिली. ही मोहीम कशी फत्ते पडली ? सर्व जवान सहीसलामत कसे परत आले ? कसं प्लानिंग करण्यात आलं होतं ? या सर्वाच्या चर्चा आपण त्यानंतर वाचल्या. पण या सर्जिकल स्ट्राइकच्या यशाचे श्रेय तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकरांना जाते. आपल्या कार्यकाळात त्यांनी देशहिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेतले. सर्जिकल स्ट्राइक देखील त्यातलाच एक निर्णय होता. लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी पर्रिकरांचा आठवणी ताज्या केल्या आहेत. नॅशनल मीडिया सेंटरमध्ये शुक्रवारी मनोहर पर्रिकरांच्या ६४ व्या जयंती निमित्त ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१६ मध्ये झालेल्या उरी हल्ल्यानंतर सतीश दुआ यांची मनोहर पर्रिकरांशी भेट झाली. पर्रिकरांशी पहिली भेट ही अत्यंत वाईट वेळात झाली होती. उरी कॅम्पवर हल्ला झाल्याचे कळताच ते गोव्याहून थेट दिल्ली आणि मग जम्मू काश्मीर पोहोचले. मी त्यांना रिसीव्ह करायला गेलो होतो. त्या हल्यात आपले १८ जवान शहीद झाले. पहिल्यांदा त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती करुन घेतल्याचे सतीश दुआंनी सांगितले. 



त्यानंतर काही वेळाने सतीश दुआ जेव्हा पर्रिकरांच्या कार्यालयात गेले तेव्हा त्यांनी दोन्ही बाबी विचारल्या. पर्रिकरांचा पहिला प्रश्न ऑपरेशन संदर्भात असल्याने दुआंनी त्यावर भाष्य केले नाही. नंतर ते म्हणाले, पाहा..आपल्याकडून एकाही जीवाला धोका पोहोचता कामा नये. मी त्यांना पूर्ण विश्वास दिला. त्यानंतर त्यांनी सर्जिकल स्ट्राइक करण्याची परवानगी दिली. ज्याच्या दहा दिवसांच्या आतच दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यात आले. 


सैन्य दलातील वर्षानुवर्षे रखडलेले प्रोजेक्ट पर्रिकरांनी मार्गी लावले. त्यांच्यासोबत काम करणे हे नेहमीत स्मरणीय असल्याचे दुआ म्हणाले. केंद्रीय संरक्षण मंत्री बनल्यानंतर अनेकजण त्यांना सूट घालण्याचा सल्ला देत असतं. पण ते नेहमी हाफ शर्टवर साधेपणाच्या राहणीत दिसतं असे भाजपचे माजी राज्यसभा सदस्य तरुण विजय यांनी यावेळी म्हटले. जेव्हा आम्ही त्यांना उत्तराखंडच्या शहीद जवानांबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी देहरादूनच्या चीडबागमध्ये शौर्य स्थळास मंजूरी देत भूमी पूजन केले होते.