Union Budget 2024: आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.  सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यांच्या नावावर 5 पूर्ण आणि आजचा अंतरिम अर्थसंकल्प असे एकूण 6 अर्थसंकल्प सादर केल्याची नोंद होईल. निवडणुका तोंडावर असल्याने हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने जनतेच्या याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या वर्षी 2023 च्या अर्थसंकल्पात देशातील महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना जाहीर करण्यात आली होती. या एकवेळ बचत योजनेत महिलांना 7.5 टक्के व्याज दिलं जातंय. यंदाही अर्थसंकल्पाकडून महिलांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा असू शकतात, असं मानलं जातंय.


महिलांसाठी होऊ शकतात या घोषणा


  • महिलांसाठीच्या बजेटमध्ये वाढ करता येईल. गेल्या 10 वर्षांत वाटप 30% वाढलं आहे.

  • डायरेक्ट कॅश ट्रान्सफरसारख्या योजना महिलांसाठी शक्य आहेत.

  • महिलांसाठी कौशल्य विकास योजना शक्य आहे.

  • महिला शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी 12 हजार रुपयांपर्यंत असू शकतो.

  • मनरेगासाठी महिलांना विशेष आरक्षण आणि उच्च मानधनाची अपेक्षा आहे.

  • महिलांना बिनव्याजी कर्ज दिले जाऊ शकते.


अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्याच्या मागणीदरम्यान, NPS (नवीन पेन्शन प्रणाली) आकर्षक बनवण्यासोबतच महिलांसाठी काही वेगळी कर सूट मिळण्याची आशा आहे. महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी आणि त्यांना पुढे नेण्यासाठी काही योजनाही जाहीर केल्या जाऊ शकतात. निवडणूक वर्षात स्टँडर्ड डिडक्शनच्या रकमेत वाढ करून नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि सध्या डॉ.बीआर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी बेंगळुरूचे कुलगुरू एन आर भानुमूर्ती यांच्या सांगण्यानुसार, सरकारची भूतकाळातील भूमिका पाहता आगामी अंतरिम अर्थसंकल्प लोकाभिमुख होण्याची शक्यता नाही.