नवी दिल्ली: मोदी सरकारच्या काळात निवडणूक जवळ येते तेव्हाच सर्जिकल स्ट्राईक होतात, असा आरोप काँग्रेस नेते अखिलेश सिंह यांनी केला. त्यांनी रविवारी एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. तत्पूर्वी भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेलगत असणाऱ्या तंगधारमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याची बातमी रविवारी समोर आली. या कारवाईत पाकिस्तानचे ११ जवान ठार झाले असून २२ दहशतवाद्यांचाही मृत्यू झाल्याचे समजते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर 'एएनआय'शी बोलताना अखिलेश सिंह यांनी म्हटले की, मोदी सरकारच्या काळात जेव्हा मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका होतात तेव्हा सर्जिकल स्ट्राईक करण्याचा पॅटर्न तयार झाला आहे. खऱ्या समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण केले जात असल्याचे अखिलेश सिंह यांनी म्हटले. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. त्या अनुषंगाने अखिलेश सिंह यांनी हे वक्तव्य केले.


भारतीय सैन्यदलाची कारवाई होऊनही पाकिस्तानचा भलताच कांगावा


यापूर्वी काँग्रेसकडून बालाकोट एअर स्ट्राईकवरही शंका उपस्थित करण्यात आली होती. त्यावरून भाजपने काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे आता भाजप या आरोपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


कमलनाथ यांच्या भाच्याने नाईटक्लबमध्ये एका रात्रीत उडवले ७ कोटी रुपये


जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये रविवारी सकाळी सीमेपलीकडून काही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने बेछुट गोळीबार केला. यामध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले. यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून धडक कारवाई केली. यावेळी भारतीय सैन्याकडून उखळी तोफांचा जोरदार मारा करण्यात आला. यामध्ये नीलम व्हॅलीतील चार दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. तसेच २२ दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे समजते.