Knowledge News: रुग्णवाहिकेवर AMBULANCE उलटं का लिहिलेलं असतं? जाणून घ्या यामागचं कारण
रुग्णवाहिका एखाद्या रुग्णासाठी देवदूतासारखी असते. कारण योग्य वेळी रुग्णालयात पोहोचवण्याचं काम रुग्णवाहिकेच्या माध्यमातून होतं.
Why Ambulance Word Written Reverse: रुग्णवाहिका एखाद्या रुग्णासाठी देवदूतासारखी असते. कारण योग्य वेळी रुग्णालयात पोहोचवण्याचं काम रुग्णवाहिकेच्या माध्यमातून होतं. रुग्णवाहिका हे वैद्यकीयदृष्ट्या सुसज्ज वाहन आहे. या वाहनातून रुग्णाला उपचाराच्या ठिकाणी ने-आण करता येते. रुग्णवाहिका अत्यंत जलद सेवा आणि अत्यावश्यक अशी सेवा आहे. अनेकदा रुग्णवाहिका वेळेत रुग्णालयात पोहोचावी यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केला जातो. वाहतूक कोंडीतही रुग्णवाहिकेचा सायरन वाजला की गाड्या लगेचच रुग्णवाहिकेला वाट करून देतात. कारण आतील रुग्णावर वेळेत उपचार व्हावेत यासाठी प्रत्येक जण काळजी घेतो. पण या रुग्णवाहिकेवर AMBULANCE ही अक्षरं उलटी का लिहिलेली असतात माहिती आहे का? जर माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत सांगतो.
रुग्णवाहिकेवर AMBULANCE हा इंग्रजी शब्द ECNALUBMA असा आणि अक्षरं मिरर इमेजमध्ये लिहिली जातात. रुग्णवाहिकेवर AMBULANCE हा शब्द फक्त पुढच्या बाजूला उलटा लिहिलेला असतो. तर इतर ठिकाणी सरळ लिहिलेला असतो. याला एक विशिष्ट कारण आहे. रुग्णवाहिकेच्या पुढे असलेल्या गाडीच्या चालकाला आराश्यात उलटी अक्षरं सरळ दिसावी हा यामागाचा हेतू आहे. त्याचबरोबर ही अक्षरं लाल किंवा निळ्या रंगात लिहिलेली असतात. कारण या रंगांवर चालकाची लवकर नजर पडते. यामुळे AMBULANCE या शब्दावर लगेच नजरेस पडतो. समोरील वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हरला लगेच समजावं आणि जाण्यास जागा मिळावी, हा मुख्य हेतू आहे.
AMBULANCE हा शब्द सरळ लिहिला तर पुढील वाहनातील चालकाला उलटा दिसेल आणि गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे AMBULANCE हा शब्द सरळ लिहित नाहीत.