लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झालीय. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या प्रचाराला लागले आहेत. विविध भागातील लोकप्रिय लोकांना पक्षांमध्ये जोडण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेत समाजवादी पक्षाने आघाडी घेतली आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात आज अशाच एका प्रसिद्ध व्यक्तीने प्रवेश केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाजवादी पक्षात प्रवेश करणारी ही प्रसिद्ध व्यक्ती आहे धर्मेंद्र प्रताप सिंह. देशातील सर्वात उंच व्यक्ती म्हणून धर्मेंद्र ओळखले जातात. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे राहणारे धर्मेंद्र प्रताप सिंह हे ४६ वर्षांचे आहेत. त्यांची उंची ८ फूट १ इंच आहे. जगातील सर्वात उंच व्यक्तीपेक्षा केवळ ११ सेमीने त्यांची उंची लहान आहे. पण, देशातील ते सर्वात उंच व्यक्तिमत्व आहे.



धर्मेंद्र त्याच्या उंचीसाठी प्रसिद्ध आहे. पण, या प्रसिद्ध व्यक्तीच्या अडचणी फार कमी लोकांना माहीत आहेत. ते बेरोजगार आहेत. कारण, त्यांच्या उंचीमुळे त्यांना नोकरी मिळाली नाही. कुठेही ये-जा करताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. 


देशातील सर्वात उंच व्यक्ती असूनही त्यांना कोणत्याही राजकीय पक्षाकडून मदत मिळाली नाही. त्यांची ही अवस्था, अडचण केवळ समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी समजून घेतली. त्यांनी धर्मेंद्र यांना मदत केली, कठीण काळात साथ दिली. त्यामुळेच ऐन निवडणुकीच्या धामधुमीत धर्मेंद्र सिंह यांनी समाजवादी पक्षात जाहीर प्रवेश केला.


अखिलेश यादवसोबतचा फोटो व्हायरल
धर्मेंद्र सिंह यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याची चर्चा जोरदार रंगात आहे. अखिलेश यादवसोबतचे त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. धर्मेंद्र सिंह हे लोकांमध्ये जाऊन समाजवादी पक्षाचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. पक्षासोबत जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.