नवी दिल्ली - केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प पुढल्या आठवड्यात लोकसभेत सादर होईल. पण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला गेलेले असल्याने आता हा अर्थसंकल्प कोण मांडणार असा प्रश्न सरकारपुढे दोन दिवसांपूर्वी होता. अखेर अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेटली यांच्याकडील खात्यांची जबाबदारी पियूष गोयल यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रपती कार्यालयाकडून त्याबद्दलचे निवेदनही प्रसिद्ध करण्यात आले. तात्पुरत्या स्वरुपात पियूष गोयल यांच्यावर अर्थ आणि कॉर्पोरेट मंत्रालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प अंतरिम असला, तरी दोन महिन्यात लोकसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाचे महत्त्व सरकारसाठी अनन्यसाधारण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अडचणीच्यावेळी एखादी महत्त्वाची जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी पियूष गोयल यांच्याकडे सोपविण्याची ही पहिलीच वेळ नाही. पियूष गोयल एकप्रकारे मोदींसाठी संकटसमयी धावून येणारे दूतच झाले आहेत. प्रत्येक गावात वीज घेऊन जाणे असू दे किंवा वेगवान ट्रेनचा विषय असू दे पियूष गोयल यांनी नरेंद्र मोदींनी टाकलेली जबाबदारी पटकन पूर्ण केली आहे.


यापूर्वीही पियूष गोयल यांनी तात्पुरत्या स्वरुपात अर्थ आणि कॉर्पोरेट मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली आहे. गेल्यावर्षी किडनीच्या शस्त्रक्रियेसाठी अरुण जेटली नव्हते. त्यावेळी या मंत्रालयांची जबाबदारी पियूष गोयल यांच्याकडेच सोपविण्यात आली होती. प्रत्येकवेळी त्यांच्याकडेच महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अत्यंत शिस्तबद्धपणे, संयमाने आणि काळजीपूर्वक ते काम करतात. अरुण जेटली यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. 


मोदी सरकार सत्तेवर आल्यावर पियूष गोयल यांच्याकडे ऊर्जा, कोळसा आणि अपारंपरिक ऊर्जा या मंत्रालयांच्या राज्यमंत्र्यांची जबाबदारी होती. नंतर त्यांच्याकडे खाणकाम मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. ऊर्जामंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली होती. देशातील १८००० गावांमध्ये त्यांनी वीज पोहोचवली होती. 


२०१७ मध्ये मंत्रिमंडळाची फेररचना करण्यात आल्यावर पियूष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याचवेळी त्यांना कॅबिनेट मंत्रीही करण्यात आले. रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी हातात आल्यावर लगेचच पियूष गोयल यांनी रेल्वेचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यावर लक्ष दिले. रेल्वेगाड्या वेळेवर धावल्या पाहिजेत. यावर त्यांचा कटाक्ष असायचा. ट्रेन १८ या नव्या स्वरुपाच्या वेगवान रेल्वेची चाचणीही नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. या रेल्वेला भारताची बुलेट ट्रेन म्हणण्यात येऊ लागले आहे. रेल्वेची सुरक्षितता आणि नव्या मार्गांची आखणी याकडे पियूष गोयल यांनी पहिल्यापासून लक्ष दिले आहे.