बांधकाम इमारती आणि हिरव्या रंगाचं कापड, काय यामागचं लॉजिक?
कधी विचार केलाय का? बांधकाम सुरू असताना हिरव्या रंगाच्या कपड्याने का झाकल्या जातात इमारती
मुंबई : रस्त्यावरून जाताना बऱ्याचदा पाहिलं असेल की बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर हिरव्या रंगाचं कापड किंवा जाळी लावली जाते. आपण हे नेहमी पाहतो पण त्यामागचं लॉजिक काय असेल असा कधी प्रश्न पडलाय का? हिरवाच रंग का वापरला जातो? यामागे नेमकं कारण काय? आज याबद्दल जाणून घेऊया.
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जास्तवेळा हिरव्या रंगाचा जाळीदार कपड वापरलं जातं. हे कापड खूप जाड असतं आणि त्याला बारीक बारीक भोकं असतात. ज्याच्यातून माती खाली पडत असते. मात्र वजन असलेली गोष्ट या जाळीतून खाली येणार नाही एवढं हे कापड मजबूत असतं.
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी हेच हिरव्या रंगाचं कापड का वापरलं जातं? त्याचा रंग हिरवा का असतो? असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? नसेल तर तो पडायला हवा कारण आज यामागचं लॉजिक आपण समजून घेणार आहोत.
इमारतीचं बांधकाम सुरू असतं तेव्हा माती, दगड, वीटा, सिमेंट सारख्या गोष्टी पडण्याची भीती असते. तेव्हा ते रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या अंगावर पडू नये आणि सुरक्षेच्या दृष्टीनं हे कापड इमारतीच्या भोवताली गुंडाळलं जातं. यामुळे आजूबाजूच्या लोकांनाही माती, धूळ आणि सिमेंटचा त्रास कमी होतो.
दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे हिरवा रंग इतर रंगांपेक्षा पटकन अंधारातही डोळ्यात येतो. दिवसा दुरून तो पटकन लक्षात येतो. तर रात्रीच्या वेळी त्यावर थोडासाही प्रकाश पडला तर पटकन दिसतो. त्यामुळे बांधकामाधीन इमारत हिरव्या कापडाने झाकली जाते.
याशिवाय उंच इमारती बांधणाऱ्या कामगारांना हिरव्या रंगामुळे दिलासा मिळतो आणि ते घाबरत नाहीत हेही एक कारण आहे. हिरवा रंग डोळ्यांना उन्हातही शांत दिसतो त्यामुळे दिवसा किंवा भरउन्हात काम करण्यास त्रास होत नाही.