1st June Birthday: 1 जूनला वाढदिवस असणाऱ्या भारतीयांची संख्या एवढी जास्त का? जाणून घ्या रंजक कारणं
Why There Are So Many Birthdays On 1st June: तुमच्या ओळखीतील किती लोकांचे आज वाढदिवस आहेत? अर्थात ही संख्या नक्कीच 1 किंवा 2 नसणार तर त्याहून अधिक असणार. पण 1 जूनला एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस असण्यामागील नेमकं कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे का?
Why is 1st June A Common Birthdate In India: तुमच्या ओळखीतल्याही एखाद्याचा सॉरी अनेकांचे वाढदिवस (Birthday) आज म्हणजेच 1 जूनला (Birthday on 1st June) असतील. फेसबुक वॉलपासून ते व्हॉट्सअप ग्रुप्सवरही खास करुन तुमच्या फॅमेली ग्रुप्सवर सकाळपासूनच शुभेच्छांचा पाऊस पडत असणार. अनेकांच्या व्हॉट्सअप स्टोरीजपासून स्टेटसपर्यंत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिसत असतील. पण 1 जूनला एवढ्या लोकांचे वाढदिवस असण्याचं नेमकी कारणं तुम्हाला ठाऊक आहे का? नाही ना? हीच कारणं आपण जाणून घेणार आहोत.
या मागील मुख्य कारण काय?
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण एका अंदाजानुसार भारतातील प्रत्येक पाच व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस हा 1 जून असतो. आता यामागील कारण सांगायचं झाल्यास पु.लं. देशपांडेंच्या एका वाक्याचा आधार घेता येईल. "जवळजवळ निम्मा महाराष्ट्र जूनमध्येच जन्माला आला आणि तोही गुरुजींच्या पुण्याईमुळे…!" या वाक्यातून तुम्हाला समजलं असेलच तरी थोडं उलगडून समजून घेऊयात. 1 जून ही जन्मतारीख असलेल्या लोकांपैकी बहुतांश लोकांचा हा 'ऑन पेपर बर्थ डे' असतो. पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी 40 ते 45 वर्षांपूर्वीपर्यंत सध्याप्रमाणे जन्म-मृत्यूची नोंद ठेवण्याचा प्रकार अस्तित्वात नव्हता. त्यामुळे बर्थ सर्टिफिकेट वगैरे प्रकारही फारसा अस्तित्वात किंवा आता इतका महत्त्वाचा नव्हता. तसेच पूर्वीच्या काळी बहुतांश महिलांची प्रसुती ही सुईणींच्या मदतीने घरच्या घरीच व्हायची. त्यामुळे मुलाच्या जन्माची रुग्णालयांमध्ये नोंद असण्याचा काही संबंध नव्हताच.
हीच तारीख शाळेच्या जन्मदाखल्यावर असल्याने
मात्र अशा जन्मतारखेची नोंद नसणाऱ्या मुलांना शाळेत दाखला घेताना त्यांची जन्मतारीख विचारली जायची. त्यावेळेस फारसं शिक्षण नसल्याने अनेक आई-वडील मास्तरांना काय सोयीचं पडेल असं विचारायचे. त्यानुसार मास्तरही 1 जून तारीख टाकून मोकळे व्हायचे. यामागील कारण म्हणजे अर्ध वर्ष सरलेलं असतं आणि मुलांना पुढील वर्गात दाखला देता येतो. त्यामुळे शालेय दाखल्यावर हीच तारीख असल्याने तो जन्माचा पुरावा म्हणून पुढे सगळीकडेच कॅरी फॉर्वड होतो. त्याच अनुषंगाने अशा मूळ जन्मतारीख ठाऊक नसलेल्यांची जन्मतारीख ही कायमची म्हणजेच 'ऑन पेपर' तरी 1 जूनच असते.
दाखला कम्पल्सरी झाल्यानंतर
बरं एक जून 1 ही ऑन पेपर जन्मतारीख होण्याचं प्रमाण हे ग्रामीण भागातून अधिक वाढण्याचा काळ साधारणपणे म्हणजे 1985 पासून पुढे. कारण याच वर्षापासून जन्माचा दाखला बनवून घेणं आणि तो बनवला नसेल तर शाळेत दाखल करताना तो बनवणं अनिवार्य असायचं. त्यामुळेच अनेकांच्या जन्मदाखल्यावर सोयिस्कर म्हणून हीच तारीख असायची. एकदा का दाखल्यावर ही तारीख आली की तोच कायमचा बर्थ डे होऊन जायचा. या दिवसाला वाढदिवसांचा दिवस असंही म्हणतात.
निवृत्तीची तारीख
या तारखेची आणखीन एक गंमत म्हणजे याला सरकारी वाढदिवसही म्हणतात. सरकारी नियमांप्रमाणे निवृत्तीला आलेली व्यक्ती वयोमर्यादेनुसार 1 जूनला निवृत्त होण्याचं प्रमाणही या तारखेच्या वर नमुद केलेल्या महत्त्वामुळे अधिक आहे. म्हणजेच 1 जूनला वयाची 60 वर्ष पूर्ण करणारे अनेक सरकारी कर्मचारी 31 मे रोजी निवृत्त होतात.