मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येत महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आहे. गुरुवारी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र या सोहळ्य़ाला येणं टाळलं. कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकार स्थापन झालं होतं तेव्हा अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाचे नेते एकत्र दिसले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस देखील शिवसेनेच्या बाबतीत विचार करुन निर्णय घेताना दिसत आहे. आतापर्यंत तरी काँग्रेसने शिवसेनेसोबत चार हात लांब अशीच भूमिका कायम ठेवली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फक्त शुभेच्छा देऊन उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला येणं टाळल्याचं दिसतं आहे.


देशभरातील भाजप विरोधी पक्षाचे नेते या शपथविधीला येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण तसं झालं ऩाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आमंत्रण दिलं होतं. पण ते आले नाही.


23 मे 2018 ला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधीला विरोधी पक्षाची एकजुटता दिसली होती. पण महाराष्ट्राच्या बाबतीत ते दिसून आलं नाही. कुमारस्वामी यांच्या शपथविधीला यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, कुमारस्वामी यांचे वडील आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसपा प्रमुख मायवती आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हजर होते.


याआधी शिवसेनेची ओळख ही हिंदुत्ववादी पक्ष अशीच राहिली आहे. त्यामुळे आपल्या सेक्युलर ओळखला धक्का बसू नये म्हणून इतर विरोधकांनी या शपथविधीला येण्याचं टाळल्याची चर्चा रंगत आहे.