हिंदीपेक्षा दाक्षिणात्य चित्रपट जास्त कमाई का? जाणून घ्या...
भारतीय स्टेट बॅंकने हे महत्त्वाचे संशोधन केलं आहे
आजपर्यंत भारतीय प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या हिंदी चित्रपटांना (Bollywood Movies) गेल्या काही दिवसांपासून उतरती कळा लागल्याचं पाहायला मिळत आहे. तगडी स्टारकास्ट असलेले चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नसल्याचे पाहायला मिळत आहे. काही चित्रपट तर बॉयकॉट ट्रेंण्डमुळेही (boycott trend) हिंदी चित्रपट अपेक्षेप्रमाणे चालताना दिसत नाहीत.
तर दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपट (tollywood) हे उलट बॉलिवूड चित्रपटांपेक्षा सरस ठरत आहेत. दक्षिणेकडील चित्रपट दक्षिण भारतासह उर्वरित भारततही जोरदार चालत आहेत. त्यामुळे कोट्यावधींचा गल्ला दाक्षिणात्य चित्रपट गोळा करत आहेत.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तॉलिवूड म्हणून ओखळले जाणारे दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूड पटांवर वरचढ होताना दिसत आहे. तशी चर्चाही सध्या सुरु आहे.
या संकटाची धास्ती बॉलिवूड कलाकारांनीही घेतली आहे. यासंदर्भात भारतीय स्टेट बॅंकने (SBI) संशोधन करुन एक अहवाल तयार केला आहे. मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांनी या विषयाची काही कारणे आणि सूचना सांगितल्या आहेत.
Reminiscing the days of friday blockbuster Bollywood Releases: Are we witnessing a behavioural shift in viewers pshyche of a new India? या अहवालामध्ये काही मुद्यांचा समावेश केला आहे ज्यामुळे सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीला धोका निर्माण झाला आहे.
कोविडमुळे चित्रपटगृहे बंद होती
कोविडकाळात सिनेमागृह बंद
अहवालात म्हटले आहे की, कोविडकाळात, हिंदी चित्रपटांमधील कथांमुळे कमाईवर परिणाम होत आहे. कोविड-19 ने ते काम केले जे दोन महायुद्धे करू शकले नाहीत. कोविड काळात घराबाहेर पडण्याची परवनागी नसल्याने सिनेमागृह बंद होते. कोविडपूर्वी, हिंदी भाषेतील 70-80 चित्रपट दरवर्षी प्रदर्शित होत होते आणि 3000-5000 कोटींची कमाई करत होते.
पण जानेवारी 2021 ते ऑगस्ट 2022 पर्यंत हिंदी भाषेत (मूळ + दक्षिण/इंग्रजी ते हिंदी डब केलेले चित्रपट) 61 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यांची एकूण कमाई 3200 कोटी रुपये होती. यामधील 48 टक्के कमाई डब केलेल्या चित्रपटांमधून आली आहे. मूळ हिंदी चित्रपटांची स्थिती असमाधानकारक आहे, असे अहवालात म्हटले आहे. जानेवारी 2021 पासून 43 हिंदी चित्रपटांचे सरासरी रेटिंग 5.9 आहे. तर हिंदीत डब केलेल्या 18 चित्रपटांचे रेटिंग 7.3 आहे.
अहवालात म्हटले आहे की, 'चित्रपटाचे रेटिंग हे आशयाचा प्रभाव मोजण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे आणि सर्वच चांगल्या चित्रपटांना चांगले रेटिंग आणि चांगले कलेक्शन मिळेल' असे सामान्यपणे मानले जाते. एसबीआयच्या मते IMDB रेटिंगमध्ये एक अतिरिक्त पॉइंट देखील 17 कोटींचा बॉक्स ऑफिस कलेक्शन देतो.
सिंगल स्क्रीन थिएटर्सची घट आणि एकाच वेळी मल्टिप्लेक्सची संख्या वाढल्यामुळे हिंदी चित्रपट उद्योगालाही समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे संशोधनात म्हटले आहे.
दक्षिण भारतात सर्वाधिक सिंगल स्क्रीन थिएटर्स
एका मल्टिप्लेक्समधील तिकिटाची किंमत ही सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या चौपट असते. मल्टिप्लेक्समधील तिकिटाची किंमत ही इतकी महाग असण्याचं कारण म्हणजे मनोरंजन कर. देशातील 62 टक्के सिंगल स्क्रीन थिएटर्स हे एकट्या दक्षिण भारतात आहेत. तर उत्तर भारतात 16 टक्के आणि पश्चिम भारतात 10 टक्के आहे. त्यामुळेच दक्षिणात्य चित्रपट बॉलिवूड चित्रपटांपक्षेा जास्त कमाई करतात.
ओटीटीमुळे (OTT) मोठा फटका
विविध राज्यतील जनसंख्याही यामागचे कारण असण्याची शक्यता अहवालामध्ये वर्तवण्यात आली आहे. कारण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विविध चित्रपट अगदी कमी किमतीत पाहता येत आहेत. तरुणाई मोठ्या प्रमाणात याला प्राधान्य देताना दिसत आहे.
दक्षिण भारतात वृद्धांची संख्या उत्तर भारताच्या तुलनेने जास्त आहे. या प्रेक्षकांना ओटीटी पेक्षा मोठ्या स्क्रीनवर चित्रपट पाहणे आवडते.
ओटीटची वाढती लोकप्रियता हेही बॉलिवूड इंडस्ट्रीचे टेंशन वाढवणारं मुख्य कारण आहे. कमाईमध्ये ओटीटीचा वाटा हा 7-9 टक्के आहे आणि दिवसेंदिवस तो वाढत आहे. सध्या देशात विविध भाषांचे 40 ओटीटी प्लेअर आहेत जे स्वतःचा कंटेट देत आहेत.
अहवालानुसार भारतात 45 कोटी ओटीटी सबस्क्राईबर आहेत आणि पुढील वर्षापर्यंत ही संख्या 50 कोटींपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे सिनेप्रेमी आणि कमाई दोन्हीही ओटीटीच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे. कारण 50 टक्के लोक दिवसाचे पाच तास हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर घालवतात.