Husband Angry On Wife: नवरा बायकोतील भांडण हे काही कोणाच्या घरी नवीन नाही. पण एकाच कारणावरुन वारंवार भांडण होत असतील तर तो प्रश्न वेळीच सोडवला नाहीतर घटस्फोटापर्यंत प्रकरण कधी पोहोचेल सांगता येत नाही. असेच एक हैराण करणारे प्रकरण उत्तर प्रदेशातून समोर आले आहे. येथे साडी नेसण्यावरुन सुरु झालेलं भांडण घटस्फोटापर्यंत पोहोचलंय. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बायको आवडीची साडी नेसत नाही म्हणून नवरा घरी नेहमी वाद घालतो. सुरुवातीला पत्नीला ही मस्करी असल्याचे वाटले. त्यानंतर काही दिवस नवऱ्याकडून हीच तक्रार येऊ लागली. पण दरदिवशीच्या या भांडणाला पत्नी कंटाळली असून ती आता माहेरी गेली आहे. आता हे प्रकरण फॅमिली कोर्टात गेलंय. येथे या दोघांची काऊन्सिलिंग करण्यात येत आहे. 


जनपद आगरा येथे राहणाऱ्या तरुणीचा विवाह हाथरस येथील तरुणासोबत झाला. आता या दोघांच्या लग्नाला 8 वर्षे झाली आहेत. हिंदु रिती रिवाजानुसार दोघांचे लग्न मोठ्या धामधुमीत झालं. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. पण का कळेना पती अचानक विचित्र वागू लागला. 


पत्नीवर खूप प्रेम करतो


मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो. मला सारख वाटतं की पत्नीने माझ्या पसंतीची साडी नेसावी. पत्नीला माझ्या आवडीच्या साडीत बघून मला खूप प्रसन्न वाटतं, असं नवऱ्याने फॅमिली कोर्टात सांगितलं. 


पत्नीनेही मांडली आपली बाजू 


दुसरीकडे पत्नीनेदेखील आपली बाजू मांडली आहे. मी नेहमी पतीच्या आवडीचीच साडी नेसते. कधीतरी माझ्या आवडीची साडी नेसली तर पती नाराज होतो. नाराज झाल्यावर तो मनाला वाट्टेल ते बोलू लागतो. यावरुन आमच्या दोघांमध्ये भांडण होतं. या रोजच्या भांडणाला कंटाळून मी 2 महिन्यांपूर्वीच माहेरी आलीय, असे पत्नी सांगते. 


पत्नीकडून पोलिसांत तक्रार 


माहेरी गेलेल्या पत्नीबद्दल पतीने पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी हे प्रकरण परिवार तक्रार निवारण केंद्रात पाठवले. येथे काऊन्सिलर डॉ. अमित गौड यांनी दोघांचे काऊन्सिलिंग केले. हे प्रकरण खूप विचित्र आहे. 


पती मानसिक रुग्ण?


बायकोना आपल्या आवडीची साडी नेसावी, असं पतीला वाटतंय. पती हा मानसिकरित्या आजारी असून तो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो, अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी सांगितले.  आम्ही दोघांनाही समजावले आहे. दोघांमधील वाद आता मिटला आहे. हालचाल विचारपूस करण्यासाठी दोघांना पुढची तारीख देण्यात आली असल्याचेही डॉक्टर म्हणाले.