आमचे ५२ खासदार भाजपला पुरून उरतील; इंच इंच लढवू- राहुल गांधी
आम्ही प्रत्येक दिवशी भाजपविरुद्ध प्राणपणाने लढू.
नवी दिल्ली: लोकसभेत काँग्रेसचे फक्त ५२ खासदार असले तरी ते भाजपला पुरून उरतील, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. ते शनिवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या बैठकीत बोलत होते. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच काँग्रेसची मोठी बैठक झाली. या बैठकीला लोकसभेतील काँग्रेसचे नवनिर्वाचित ५२ आणि राज्यसभेतील खासदार उपस्थित होते. या सर्वांनी मिळून सोनिया गांधी यांची पक्षाच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड केली.
यावेळी राहुल गांधी यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी म्हटले की, लोकसभेत आमचे ५२ खासदार आहेत. मात्र, मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, हे ५२ जण भाजपविरोधात इंच इंच लढवतील. आम्ही प्रत्येक दिवशी भाजपला कडवी टक्कर देऊ, असे राहुल यांनी सांगितले.
तुम्ही कोण आहात हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही देशातील प्रत्येक नागरिकासाठी लढणार आहात, मग तो कोणत्याही जातीधर्माचा असू दे. तुमची लढाई ही द्वेषयुक्त भ्याडपणा आणि रागाविरुद्ध आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक आक्रमकपणे काम करावे लागेल, असे राहुल यांनी सांगितले.
दरम्यान, या बैठकीत सोनिया गांधी यांनीही राहुल गांधींचे तोंडभरून कौतुक केले. राहुल गांधी हे दूरदृष्टी असलेले नेते असल्याचे सोनिया यांनी म्हटले. तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवर विश्वास दाखवणाऱ्या मतदारांचेही सोनियांनी आभार मानले.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला होता. मात्र, राष्ट्रीय कार्यकारिणीने राहुल यांचा राजीनामा फेटाळून लावला होता.