पुन्हा निवडणूक लढणार नाही, उमा भारतींची घोषणा
भाजपच्या दिग्गज नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती पुन्हा कधीच निवडणूक लढणार नाहीत.
लखनऊ : भाजपच्या दिग्गज नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती पुन्हा कधीच निवडणूक लढणार नाहीत. वय आणि तब्येत साथ देत नसल्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं उमा भारती यांनी सांगितलं आहे.
उमा भारती या मध्य प्रदेशच्या झांसीमधून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. उमा भारती दोनवेळा खासदारकीच्या निवडणुकीत जिंकल्या. पक्षासाठी मी बरच काम केलं. पण आता गुडघा आणि पाठीच्या त्रासामुळे काम करणं अवघड जात असल्याचं उमा भारती म्हणाल्या.
निवडणूक लढणार नसले तरी पक्षाचं काम करत राहिनं, असं स्पष्टीकरण उमा भारतींनी दिलं आहे. उमा भारती या सध्या पेयजल मंत्री आहेत. १९८४मध्ये उमा भारतींनी पहिल्यांदा निवडणूक लढली होती. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर १९८९मध्ये त्यांनी खजुराहो मतदारसंघातून निवडणूक लढली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाल्यानंतर १९९९ पर्यंत त्या खासदार राहिल्या. यानंतर भोपाळमधून त्यांनी निवडणूक लढायला सुरुवात केली.
लोकप्रतिनधी असताना उमा भारतींनी अनेक मंत्रीपदं भुषवली आहेत. राज्यामध्ये उमा भारती मनुष्यबळ विकास मंत्री, क्रीडा मंत्री होत्या. तर अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये त्या कोळसा आणि खनीज मंत्री होत्या. २०१४ साली मोदींच्या सरकारमध्ये उमा भारती जल संसाधन, नदी विकास आणि गंगा स्वच्छता मंत्री होत्या. सप्टेंबर २०१७ मध्ये त्यांच्याकडून ही खाती काढून घेण्यात आली आणि आता त्यांच्याकडे पेयजल मंत्रीपद आहे.