तुम्ही आम्हा सर्वांना ठार मारणार का; प्रकाश राज यांचा मोदी-शहांना सवाल
तुम्ही याच जनतेविरोधात असा निरंकुश वापर करणार आहात का?
नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) विरोध करताना बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फटकारले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून पोलिसांकडून आंदोलकांना करण्यात येणाऱ्या मारहाणीचा व्हीडिओ पोस्ट करत 'तुम्ही आम्हा सर्वांना ठार मारणार का', असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारला आहे.
नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून देशात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. अनेक ठिकाणी या आंदोलनांनी हिंसक रुप धारण केले. दिल्लीच्या जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांनी ट्विट करून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर निशाणा साधला. माननीय पंतप्रधानजी आणि गृहमंत्रीजी तुम्हाला दिलेल्या अधिकारांचा तुम्ही याच जनतेविरोधात असा निरंकुश वापर करणार आहात का? तुम्ही आम्हा सर्वांना ठार मारणार आहात का?, असा सवाल प्रकाश राज यांनी विचारला.
CAA विरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या जर्मन विद्यार्थ्याला देश सोडण्याचे आदेश
दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सुरु असलेल्या आंदोलनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत दोन तट पडले आहेत. अभिनेता परेश रावल, अनुपम खेर आणि किरण खेर यांनी CAA कायदा समजवून घ्या, असे सांगत त्याचे समर्थन केले.
तर दुसऱ्या बाजूला फरहान अख्तर, मनोज वाजपेयी, अनुराग कश्यप, हुमा कुरैशी, ऋचा चड्ढा, अली फजल, शबाना आजमी, कबीर खान, स्वरा भास्कर, सुशांत सिंह आणि सिद्धार्थ यांनी या कायद्याला कडाडून विरोध केला आहे. यामधील अनेक कलाकारांनी सरकारविरोधी आंदोलनात सहभाग देखील घेतला होता.