नवी दिल्ली: गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ९,८८७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २,३६,६५७ इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी कोरोनाचे Coronavirus जवळपास १० हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे इटलीला मागे टाकत सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मुंबई अनलॉक होतेय, पण येत्या १० दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढेल'


देशातील तज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी जून किंवा जुलै महिन्यात भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचेल, असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज आता खरा ठरताना दिसत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत देशात सातत्याने ९५०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जगात सर्वप्रथम कोरोनाचा मोठा फटका बसलेल्या इटलीला रुग्णसंख्येच्याबाबतीत भारताने मागे टाकले आहे. त्यामुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. 



महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य आहे. मुंबई हा राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे २४३६ नवे रुग्ण आढळून आले. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याही २५ हजार ७६८ वर पोहचली असून मृतांचा आकडा १५०० वर गेला आहे. राज्यात आतापर्यंत २८४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जगभरात आतापर्यंत तब्बल ६६ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ३.९१ लाख लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.