Weather Update : यंदाची गर्मी करणार अंगाची लाही लाही; WMO ची मोठी भविष्यवाणी!
Weather Update In India : काही महिन्यांत जागतिक हवामानावर एल निनोचा (El Nino) प्रभाव कायम राहील, असंही डब्ल्यूएमओने (WHO) म्हटलं आहे.
WMO Prediction On Summer Weather Update : भारतीय मान्सूनवर एल निनोचा होणारा परिणाम आता अधिकाधिक स्पष्ट होतोय. जानेवारी ते मार्च 2024 पर्यंत एल निनो स्थिती कायम राहण्याची वर्तविण्यात आली होती. अशातच आता जागतिक हवामान संघटनेने (World Meteorological Organization) एल निनोबाबत नवीन माहिती दिली आहे. 2024 मध्येही एल निनोमुळे उष्णता वाढतच राहणार असल्याचे जागतिक हवामान संघटने म्हटले आहे. त्या काही महिन्यांत जागतिक हवामानावर एल निनोचा (El Nino) प्रभाव कायम राहील, असंही डब्ल्यूएमओने (WHO) म्हटलं आहे. त्याचा एक अहवाल नुकताच प्रकाशित झालाय. या अहवालामुळे आता आशिया देशात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
विक्रमी पाच सर्वात वाईट आपत्तींपैकी एक म्हणून एल निनो शिखरावर पोहोचल्याचं डब्ल्यूएमओने सांगितलंय. गेल्या 174 वर्षांमध्ये 2023 चा ऑगस्ट महिना हा जगभरात सर्वाधिक उष्ण महिना ठरला होता. अशातच आता यंदाचा उन्हाळा देखील अंगाची लाही लाही करणार आहे. जून २०२३ पासून प्रत्येक महिन्याने नवीन मासिक तापमानाचा विक्रम केला आहे. यामुळे 2023 हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदले गेले. सतत वाढत जाणाऱ्या या तापमानात अल निनोचाही मोठा वाटा असल्याचे डब्ल्यूएमओचे सरचिटणीस सेलेस्टे साऊलो यांनी म्हटलं आहे.
मार्च ते मे महिन्यापर्यंत अल निनो कायम राहण्याची शक्यता 60 टक्के आहे. तर, एप्रिल ते जून महिन्यादरम्यान ही शक्यता 80 टक्क्यांवर पोहोचेल. जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण झाल्याचा अर्थ असा होऊ शकतो की भारतात यावर्षी मान्सूनचा पाऊस 2023 च्या तुलनेत चांगला होईल, असा देखील अंदाज वर्तविण्यात आला आहे. जर एल निनोचा प्रभाव कायम राहिला तर ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि आशियातील देशांना दुश्काळाचा देखील सामना करावा लागू शकतो.
एल निनो म्हणजे काय?
दरम्यान, एल-निनो आणि ला-निना ही प्रशांत महासागरातील सागरी प्रवाहांची नावं आहेत. प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त होते, तेव्हा त्या स्थितीला एल-निनो असं संबोधलं जातं. तर जेव्हा याच प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान कमी असतं, त्या परिस्थितीला ला-निना म्हटलं जातं. महासागराच्या वाऱ्याची दिशी आणि त्याच्या तापमानाचा परिणाम जगातील अधिकाधिक भागांवर दिसून येतो.