पती जिवंत असताना पत्नीने मृत्यू झाल्याचे सांगितले, कारण... बालासोर रेल्वे दुर्घटनेतील धक्कादायक प्रकार
ओडिशातील बालासोर अपघातानंतर 51 तासांनी रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत झाली. अपघाताची सीबीआय चौकशी होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.
Odisha Train Accident: ओडिशामधील रेल्वे दुर्घटनेमुळे (Odisha Train Accident) संपूर्ण देश हादरला आहे. अत्यंत भयानक असा या अपघातात या 275 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1100 जण जखमी झाले आहेत. या अपघातात अनेक जण आश्चकारकरित्या बचावले आहेत. बचावलेल्या लोकांचे चमत्कारीक अनुभव थक्का करणारे आहे. त्यातच आता बालासोर रेल्वे दुर्घटनेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने पती जिवंत असताना त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी या महिलेची चौकशी केली. चौकशीदरम्यान महिलेने यामागचे कारण सांगितल्यावर पोलिसही हादरले आहेत.
रेल्वे दुर्घटनेच पतीचा मृत्यू झाल्याचा महिलेचा दावा
बालासोर रेल्वे दुर्घटनेत पतीचा मृत्यू झाल्याचा दावा एका महिलेने केला. गीतांजली दत्ता असे या महिलेचे नाव आहे. कटक जिल्ह्यातील मनियाबांदा येथे राहणाऱ्या गीतांजली यांनी रेल्वे अपघातात पतीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच मी स्वत: पतीच्या मृतदेहाची ओळख पटवल्याचा दावा देखील या महिलेने केला.
पोलिस तपासात धक्कादायक खुलासा
यामहिलेने रेल्वे अपघातात पतीचा मृत्यू झाल्याचा दावा केल्यानंतर पोलिसांनी याचा सखोल तपास केला. यात महिलेचे बिंग फुटले. या महिलेचा पती जिवंत असल्याचे तपासात उघडकीस आले. ही महिला पतीसोबत राहत नससल्याचे देखील समजले. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.
महिलेच्या पतीनेच केली तक्रार
महिलेने रेल्वे दुर्घटनेत पतीचा मृत्यू झाल्याचा दावा केल्यानंतर एकच गोंधळ उडाला. महिलेच्या पतीला याबाबत समजले. गीतांजली यांचे पती बिजय दत्ता यांनीच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गीतांजली आणि मी सोबत राहत नाहीत. मागील 13 वर्षांपासून आम्ही वेगळे राहत आहोत. माझी, संपत्ती मिळवण्यासाठी गीतांजली अनेक कट रचत असल्याचे बिजय दत्ता यांनी सांगितले.
का केला रेल्वे दुर्घटनेत पतीचा मृत्यू झाल्याचा?
गीतांजली यांनी रेल्वे दुर्घटनेच पतीचा मृत्यू झाल्याचा खोटा दावा का केला याची चौकशी पोलिसांनी केली. यावेळी धक्कादायक खुलासा झाला. बालासोर रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ओडिशा सरकार 5 लाख, पीएम रिलीफ फंडातून दोन लाख रुपये आणि रेल्वे मंत्रालयातर्फे 10 लाख रुपये इतकी नुकसान भरपाई दिली जात आहे. यामुळे नुसकान भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी महिलेने पतीचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डिजीटल सुविधा
अनेक मृतदेह अजूनही रुग्णालयात पडून आहेत. त्यांची ओळख पटवण्यासाठी आता प्रशासनाने डिजीटल सुविधा पुरवली आहे. यासाठी पुढाकार घेतलाय तो बालासोरचे मराठमोळे जिल्हाधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी. मृतांची ओळख पटवण्यासाठी वेबसाईटची सुविधा पुरवण्यात आलीय. या वेबसाईटवर मृतांची तसंच जखमींची नाव आणि फोटोसह माहिती अपलोड करण्यात आलीय. तसंच नातेवाईकांच्या मदतीसाठी दोन कंट्रोल रुमही सुरु करण्यात आल्या आहेत.