Pressure Cooker Blast: स्वयंपाकघरात जेवण शिजवत असताना गृहिणी प्रेशर कुकरचा सर्रास वापर करतात. प्रेशर कुकरमुळे जेवणाचा वेळही वाचतो आणि गॅसचीही बचत होते. मात्र, प्रेशर कुकरचा वापर योग्य व्हायला हवा. अन्यथा तुमच्या छोट्याशा चुकीमुळं जीवावर बेतू शकते. जयपूरमध्येच एक भयानक घटना घडली आबे. स्वयंपाकघरात असलेल्या महिलेने डाळ बनवण्यासाठी कुकरचा वापर केला होता. डाळ बनवत असताना अचानक कुकरमध्ये अतिरिक्त प्रेशर तयार झाले आणि त्यामुळं कुकरचा भीषण स्फोट झाला. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळच्या वेळीच ही घटना घडली आहे. त्यावेळी महिलेचा पती ऑफिसला जाण्याची तयारी करत होता तर त्यांचा एकुलता एक मुलगा बाजारात सामान आणण्यासाठी गेला होता. किरण कंवर असं या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, राजकुमार सिंह असं महिलेच्या पतीचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला किचनमध्ये जेवण बनवत होती. त्याचवेळी डाळ बनवण्यासाठी तिने कुकर लावला होता. मात्र, काही कळायच्या आतच कुकरचा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर कुकरचे अॅल्युमिनियमचे तुकडे चेहऱ्यावर आणि डोक्यावर उडाले. घाव वर्मी बसल्याने आणि अतिरक्तस्त्राव झाल्याने किरण कंवर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिस या घटनेची कसून चौकशी करत आहेत. तसंच, शवविच्छेदनासाठी महिलेचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर सगळं काही इतक्या कमी वेळात झालं की कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. 


या घटनेमुळं परिसरातील एकच भीती पसरली आहे. पोलिसांकडून या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. त्याचबरोबर कुकर जुना होता की नवीन याबाबतही चौकशी करण्यात येत आहे. तसंच, कुकरचा स्फोट नक्की कसा झाला व कोणत्या कंपनीचा होता, याचाही तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुकर हा सगळ्यांच्या घरात आढळतो. अशावेळी या प्रकरणाची सर्व प्रकारे तपास करण्यात येत आहे. किचनमध्ये अशाप्रकारे कुकरचा स्फोट होणे गंभीर आहे. 


कुकरची शिट्टी खराब झाल्याने वाफ बाहेर येत नव्हती. त्यामुळं कुकरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रेशर तयार झाले आणि त्यामुळेच कुकरचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 


दरम्यान, कुकरचा स्फोट झाल्यानंतर घटनास्थळावरुन तब्बल 200 मीटर दूरपर्यंत स्फोटाचा आवाज गेला. स्फोटात कुकर पूर्णपणे फुटला होता. त्याचे छोटेछोटे तुकडे घरभर पसरले होते. तर, किचनच्या खिडकीला लावलेली जाळीदेखील तुटली आहे. स्फोटाच्या आवाजानंतर किरण यांचे शेजारीही धावत तिथे आले. तेव्हा किरण किचनमध्ये मृतावस्थेत पडलेल्या दिसल्या. कुकरचे तुकड्यांमुळं त्या गंभीर जखमी झाल्या होत्या तसंच, त्यांचा चेहराही गंभीररित्या भाजला होता.