नवी दिल्ली : भारतीय सैन्यात महिलांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर संधी देणार असल्याचं लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सांगितलं. त्यामुळे लिंगभेदाच्या अडथळ्यापासून दूर जात भारतीय महिला आता युद्धभूमीवरही दिसण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरूषांचे वर्चस्व असणारे क्षेत्र वेगाने बदलत असून सैन्याच्या पोलीस दलात महिलांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सध्या सैन्यामध्ये वैद्यकीय, कायदा, शिक्षण आणि इंजिनिअरींग क्षेत्रात महिला मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र काही कारणांमुळे त्यांची नियुक्ती युद्धभूमीवर केली जात नव्हती.


जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, नॉर्वे, स्विडन, इस्त्राईल या देशांमध्ये महिला सैन्यातील अनेक विभागात भूमिका बजावत आहेत. मागील वर्षी भारतीय सैन्याच्या हवाई दलात प्रायोगिक तत्वावर तीन महिलांना फायटर पायलट म्हणून संधी देण्यात आली होती. याचबरोबर नौदलातही महिलांची युद्धबोटीवर नेमणूक करण्याचा विचार सुरू आहे.