नवी दिल्ली: कोरोना नियंत्रणात येत असताना पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम बरं की ऑफीसला जाणं जास्त चांगलं, याची चर्चा सुरू झाली आहे. कर्मचारी ऑफीसमध्ये यायला फारसे राजी नसले, तर त्यांना लालूच दाखवण्यासाठी काही कंपन्यांनी स्कीम सुरू केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची दुसरी लाट हळूहळू आटोक्यात येत असताना आता वर्क फ्रॉम होमचं फॅड कमी करून कर्मचा-यांनी कामाच्या ठिकाणी यावं, यासाठी कंपन्यांनी प्रयत्न सुरू केलेत. टीसीएस, विप्रो, इन्फोसिस यासारख्या कंपन्यांनी टप्प्याटप्प्यानं कर्मचा-यांना परत बोलावण्यास सुरूवात केली आहे. मात्र 2 वर्षं घरून काम करायीच सवय झालेले कर्मचारी या स्कीममुळे ऑफिसला जाणं पसंत करणार का हे पाहाणं महत्त्वाचं आहे.


एऑननं केलेल्या एका सर्व्हेनुसार 60 टक्के टेक फर्म्सना निम्मे कर्मचारी आता कार्यालयात यायला हवेत. तर मर्सर या कन्सल्टिंग मॅनेजमेंट कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणानुसार 10पैकी 6 कर्मचारी हे हायब्रीड, म्हणजे काही दिवस घरून काही दिवस कार्यालयातून काम करण्यास तयार आहेत. 10पैकी दोघांना दररोज ऑफीसमध्ये जाऊन काम करणं पसंत आहे. तर उर्वरित दोघे हे घरूनच काम करायला पसंती देत आहेत. 



अमेरिकेमध्ये कर्मचारी ऑफीसमध्ये यावेत म्हणून अनेक कंपन्यांनी गाजर द्यायला सुरूवात केली आहे. अमेरिकेतील एका रिअल इस्टेट फर्मनं लसीकरण पूर्ण झाल्यानंतर ऑफीसला येणा-या कर्मचा-यांना हजारो डॉलर्सचा भत्ता देऊ केला आहे. या कर्मचा-यांना कंपनीच्या खर्चानं व्हॅकेशनचंही आमिष दाखवण्यात आलं आहे. गोल्डमन सॅचच्या मुख्यालयामध्ये ब्रेकफास्ट, लंच, आईसक्रीम फ्री देण्यात येतं आहे. 


भारतातील बड्या कंपन्यांनी अद्याप अशा गिफ्ट द्यायला सुरूवात केली नसली, तरी काही प्रमाणात याची सुरूवात झाली आहे. रिलोकेशन अलाऊन्स किंवा ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी देऊन अधिकाधिक कर्मचारी कामाच्या ठिकाणी यावेत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता घरून काम करण्याची सवय लागलेले कॉर्पोरेट कर्मचारी 'या चिमण्यांनो परत फिरा' या कंपन्यांच्या हाकेला कसा प्रतिसाद देतात, यावर पुढल्या काळातलं वर्क कल्चर अवलंबून राहणार आहे.