चंडीगढ : राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाने (State Consumer Disputes Redressal Commission) पेप्सिको इंडिया कंपनीला ५ लाखांचा दंड ठोठावला आहे. माउंटन ड्यूच्या खरेदी केलेल्या एका बाटलीमध्ये ग्राहकाला मेलेला किडा आढळला. त्यानंतर त्याने ग्राहक मंचाकडे (कंज्यूमर फोरम) याबाबत तक्रार दाखल केली. पण ग्राहक मंचाने तक्रारदाराची याचिका फेटाळली. यानंतर तक्रारदाराने राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे आव्हान दिलं. आता तक्रारदाराच्या याचिकेवर सुनावणी करताना आयोगाने माउंटन ड्यू बनवणाऱ्या पेप्सिको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तक्रारदाराचे वकील फतेहजीत सिंह यांनी सांगितलं की, आयोगाने ५ लाखांचा दंड भरण्याचं सांगितलं आहे. त्यासोबतच तक्रारदाराला झालेल्या त्रासासाठी नुकसान भरपाईची रक्कम म्हणून ६० हजार रुपये आणि केसच्या खर्चासाठी २५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय ज्या दुकानातून माउंटन ड्यूची बाटली खरेदी केली होती, त्या दुकानदाराकडून बाटलीचे ३५ रुपये परत देण्याचेही नमूद केले आहे.


मोहाली नयागांव येथे राहणारे नवीन सेठी यांनी २१ जून २०१५ मध्ये सेक्टर २३ येथील दुकानातून ३५ रुपयांची माउंटन ड्यूची बाटली खरेदी केली होती. त्या बाटलीमध्ये त्यांना एक मेलेला किडा आणि इतर काही गोष्टी आढळल्या होत्या. त्यांनी याबाबत ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. परंतु ग्राहक मंचाने त्यांची तक्रार फेटाळून लावली होती.


बॉटल उत्पादन तारखेच्या (manufacture date) एक वर्षानंतर टेस्टिंगसाठी पाठवण्यात आली असल्याचं ग्राहक मंचाने सांगितलं. तपासणीनंतर आलेल्या रिपोर्टमध्ये, बॉटलमध्ये आढळलेली गोष्ट असुरक्षित (Unsafe) असल्याचं समोर आलं. परंतु तरीही ग्राहक मंचाने तक्रारदाराची याचिका फेटाळली होती.


आपली बाजू मांडताना, पेप्सीको कंपनीने सांगितलं की, बनावट उत्पादक कंपन्या त्यांच्या ब्रँडच्या नावाचा वापर करुन पेयांची विक्री करत आहेत. त्याविरोधात त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.