मी एका नालायक मुलाचा लायक बाप- यशवंत सिन्हा
गेल्यावर्षी रामगढ येथे मोहम्मद अलीमुद्दीन या मांस व्यापाराचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता.
नवी दिल्ली: रामगढ मॉब लिचिंगमधील आरोपींचा हार घालून सत्कार करणाऱ्या जयंत सिन्हा यांना त्यांचे तीर्थरुप यशवंत सिन्हा यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. काहीजण माझ्यावर टीका करताना मला 'लायक बेटे का नालायक बाप' असे म्हणतात. मात्र, आता ही परिस्थिती अगदी उलट झाली आहे. हेच ट्विटर आहे. मी माझ्या मुलाच्या कृतीचे समर्थन करत नाही. मात्र, यानंतरही माझ्यावरती टीका होणार, याचा अंदाज मला आहे. या सगळ्या वादात तुम्ही कधीच जिंकू शकत नाही, असे ट्विट यशवंत सिन्हा यांनी केले.
गेल्यावर्षी रामगढ येथे मोहम्मद अलीमुद्दीन या मांस व्यापाराचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी मार्च महिन्यात न्यायालयाने ११ जणांना दोषी ठरवले होते. मात्र, गेल्याच आठवड्यात रांची हायकोर्टाने यापैकी ८ जणांना सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला होता. यानंतर हे सर्वजण जयंत सिन्हा यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. तेव्हा जयंत सिन्हा यांनी या सर्वांचे पुष्पहार घालून स्वागत केले होते. या घटनेनंतर जयंत सिन्हा यांना मोठ्या टीकेलाही सामोरे जावे लागले होते. तेव्हा जयंत सिन्हा यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला. या लोकांना जामीन मिळाल्यावर ते माझ्या घरी आले. मी त्यांचे अभिनंदन केले. मात्र, भविष्यात न्यायालय कायदेशीर निर्णय घेईल. तेव्हा जे दोषी असतील त्यांना शिक्षा जरुर मिळेल, असे जयंत सिन्हा यांनी सांगितले होते.