जगातील सर्वाधिक लांबीच्या एक्स्प्रेस वेची उत्तर प्रदेशात घोषणा
एकूण ६०० किलोमीटर लांबीच्या जगातील सर्वाधिक लांबीच्या गंगा एक्स्प्रेस वेची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी घोषणा केली.
प्रयागराज - एकूण ६०० किलोमीटर लांबीच्या जगातील सर्वाधिक लांबीच्या गंगा एक्स्प्रेस वेची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी घोषणा केली. सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक प्रयागराजमध्ये घेतली. त्यानंतर या निर्णयाची घोषणा करण्यात आली. या एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून प्रयागराजला पश्चिम उत्तर प्रदेशशी जोडण्यात येणार आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
एक्स्प्रेस वेची उभारणी ६५५० हेक्टर जागेवर केली जाईल. त्यासाठी अंदाजे ३६ हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. सुरुवातीला हा एक्स्प्रेस वे चार पदरी असेल, पण नंतर तो सहा पदरी करण्यात येईल. गंगा एक्स्प्रेस वे असे या मार्गाचे नामकरण करण्यात येणार असून, तो मीरत, अमरोहा, बुलंदशहर, शहाजहांपूर, कन्नोज, उन्नाव, रायबरेली, प्रतापगढ या मार्गाने प्रयागराजपर्यंत येईल. या एक्स्प्रेस वेची निर्मिती कधी पूर्ण होईल, याबद्दल अद्याप काही माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा राज्य जीएसटी मुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून तरुणांमध्ये आणि इतर नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होते. त्यामुळे त्याला राज्याच्या जीएसटीतून सूट देण्यात येत आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. गेल्या पाच दशकांपासून उत्तर प्रदेशमधील राज्य मंत्रिमंडळाची बैठक कायम लखनऊमध्येच होते आहे. पण यावेळी पहिल्यांदाच कुंभमेळ्याचे औचित्य साधून मंत्रिमंडळाची बैठक प्रयागराजमध्ये झाली.