तुम्हालाही `आधार` लिंक करण्यासाठी फोन येत आहे? मग सावधान
आधार कार्ड वर्तमानकाळात किती उपयोगी झालं आहे हे सर्वांनाच माहिती आहे. केंद्र सरकारने जवळपास सर्वच ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य केलं आहे.
नवी दिल्ली : आधार कार्ड वर्तमानकाळात किती उपयोगी झालं आहे हे सर्वांनाच माहिती आहे. केंद्र सरकारने जवळपास सर्वच ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य केलं आहे.
बँक अकाऊंटपासून सिम कार्डपर्यंत जवळपास सर्वच सेवांना आधार कार्डसोबत लिंक करावं लागत आहे. फोन नंबरही आधार कार्डसोबत लिंक करण्यास सांगितलं आहे. सिम कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख फेब्रुवारी २०१८ पर्यंत देण्यात आली आहे.
आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात तारीख अनेकदा वाढवून दिली आहे. त्याचाच फायदा काही नागरिक घेताना दिसत आहे. मुंबईत राहणाऱ्या शाश्वत गुप्ता यालाही अशाच प्रकारे फसवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
शाश्वत हे केरळमधील कोझीकोड येथील एका प्रायव्हेट फर्ममध्ये काम करतात. एके दिवशी शाश्वत यांना फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना आधार कार्ड - फोन नंबरसोबत लिंक करण्यास सांगितले आणि या दरम्यान त्या व्यक्तीने शाश्वत यांच्याकडून तब्बल १ लाख ३० हजार रुपयांचा चूना लावला.
शाश्वत यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये त्यांच्यासोबत झालेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. ही आहे शाश्वत यांची फेसबुक पोस्ट:
शाश्वत यांनी लिहीलं आहे की, "मला एका व्यक्तीने एअरटेल कंपनीचा एजंट असल्याचं सांगत फोन केला. त्याने मला सांगितलं की, माझा मोबाईल नंबर आणि सिम कार्ड कायमचचं ब्लॉक होणार आहे कारण आधार कार्डसोबत लिंक केलेलं नाहीये. त्याने माझ्याकडून सिमकार्डच्या डिटेल सोबत १२१ या नंबरवर एसएमएस पाठविण्यास सांगितलं जेणेकरुन सिमकार्ड पून्हा सुरु होईल. पण, मला लाख रुपयांचा गंडा घातला जाईल याची काहीच कल्पना नव्हती.
शाश्वत यांच्या पोस्टनंतर बँकेतर्फे त्यांना हे उत्तर मिळालं:
बँकेने म्हटलं आहे की, शाश्वत तुम्हाला जो त्रास झाला आहे त्याचं आम्हाला खूप वाईट वाटतयं. आम्ही तुमच्या SR नंबरला रजिस्टर केलं आहे. आमचे अधिकारी लवकरच तुमच्यासोबत संपर्क करतील.
दरम्यान, या प्रकरणी शाश्वतने बँकेची सेवा आणि सुरक्षेवर नाराजी व्यक्त केली आहे. शाश्वतने लिहीलेली ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.