काँग्रेसमध्ये तरुण नेतृत्त्वाला नेहमीच डावलले जाते- भाजप
राजस्थानमध्ये काँग्रेसने सत्तेवरून पायउतार झाले पाहिजे
जयपूर: काँग्रेस पक्षात नेहमीच तरूण नेतृत्त्वाकडे दुर्लक्ष करण्यात येते, त्यांना डावलले जाते, अशी टीका भाजपचे नेते सतिश पुनिया यांनी केली आहे. सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे रविवारी सकाळपासून राजस्थान आणि दिल्लीतील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. यादरम्यान काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ माजली होती. मात्र, भाजप नेत्यांकडून या सगळ्यावर भाष्य करणे टाळले जात होते. त्यामुळे भाजपच्या मनात नेमके काय सुरु आहे, याचा नेमका अंदाज येत नव्हता. अखेर राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतिश पुनिया यांनी पहिल्यांदाच या सगळ्याविषयी प्रतिक्रिया दिली.
पक्षश्रेष्ठींकडून गेहलोत यांना सर्वाधिकार; सचिन पायलटांना काँग्रेसचे दरवाजे बंद?
सतिश पुनिया यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षात तरुण नेतृत्त्वाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते, त्यांना डावलण्याचा प्रयत्न होतो. त्यांच्या या वक्तव्याचा रोख सचिन पायलट यांच्या दिशेने आहे. तसेच काँग्रेसने लोकांचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये काँग्रेसने सत्तेवरून पायउतार झाले पाहिजे, असेही पुनिया यांनी म्हटले.
आता माघार नाही; सचिन पायलट यांचा राहुल व प्रियांका गांधीना भेटण्यास नकार
सतिश पुनिया यांच्या या वक्तव्यामुळे आता राजस्थानमध्ये सत्तापालट होणार का, या चर्चेला नव्याने ऊत आला आहे. तत्पूर्वी आज दिवसभरात काँग्रेसच्या नेत्यांकडून सचिन पायलट यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सचिन पायलट यांच्याकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जयपूरमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या बैठकीला १०९ आमदार उपस्थित होते. त्यामुळे सचिन पायलट यांच्या बंडातील हवाच निघून गेल्याचे बोलले जात आहे. परंतु, विधानसभेत प्रत्यक्ष बहुमत सिद्ध करायची वेळ आल्यास यापैकी किती आमदार काँग्रेसच्या बाजूने उभे राहणार, याबाबत अद्याप साशंकता आहे. त्यामुळेच काँग्रेसने कोणताही दगाफटका टाळण्यासाठी आपल्या १०९ आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे.